भारतीय फलंदाजांचे लोटांगण; 188 धावांचे लक्ष्य

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

आज सकाळच्या सत्रात पुजारा आणि रहाणे यांनी 4 बाद 213 वरून पुढे खेळताना फिरकीपटूंचा यशस्वी सामना केला. पहिल्याच षटकात लायनने पुजाराला पायचीत बाद केले. पण, पुजाराने रिव्ह्यू घेतल्याने त्याला जीवदान मिळाले.

बंगळूर - पहिल्या डावात फिरकी आणि दुसऱ्या डावात जलदगती गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या उडविलेल्या भंबेरीमुळे भारताचा दुसरा डाव आज (मंगळवार) चौथ्या दिवशीय सकाळच्या सत्रातच संपुष्टात आला. स्टार्क आणि हेडझलवूड यांच्यासमोर भारतीय फलंदाजांनी घातलेल्या लोटांगणामुळे भारताचा डाव अवघ्या 274 धावांत आटोपला. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 188 धावांची गरज आहे.

आज सकाळच्या सत्रात पुजारा आणि रहाणे यांनी 4 बाद 213 वरून पुढे खेळताना फिरकीपटूंचा यशस्वी सामना केला. पहिल्याच षटकात लायनने पुजाराला पायचीत बाद केले. पण, पुजाराने रिव्ह्यू घेतल्याने त्याला जीवदान मिळाले. त्यानंतर या दोघांनी धावा जमवत संघाची धावसंख्या अडीचशेच्या पार नेली. अखेर 80 व्या षटकानंतर नवा चेंडू घेण्याचा कर्णधार स्मिथचा निर्णय सार्थकी लागला. स्टार्कने रहाणेला पायचीत बाद करत भारताच्या पडझडीला सुरवात केली. त्याने पुढच्याच चेंडूवर नायरला त्रिफळाबाद केले. त्याने हेझलवूडने कमाल दाखवत पुजारा, अश्विन, उमेश यादव यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. पुजाराने 92 धावांची खेळी केली. साहा आणि ईशांत यांनी काहीकाळ प्रतिकार करण्याचा प्रय़त्न केला. पण, ईशांतला बाद करत ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव संपुष्टात आणला. हेझलवूडने 6 बळी मिळविले.

त्यापूर्वी तिसऱ्या दिवशीही बॅट-बॉलमधील उंदीर-मांजराचा खेळ पहायला मिळाला होता. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 276 धावांवर संपवल्यावर पुनरागमनाची नामी संधी भारताला मिळाली. पहिल्या डावाच्या तुलनेत भारतीय फलंदाजांनी खिंड लढवायला मनापासून केलेले प्रयत्न हाणून पाडायला ऑसी गोलंदाजांनी दर थोड्या वेळाने एका फलंदाजाला बाद करायचा सपाटा लावला. सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकणार, अशी भीती वाटू लागली असताना पाचव्या विकेटकरिता पुजाराने रहाणेसह अत्यंत मोलाची 93 धावांची अतूट भागीदारी रचली होती. त्याचे रुपांतर त्यांनी आज शतकी भागीदारीमध्ये केले.

Web Title: Mitchell Starc and Josh Hazlewood derailed the Indian innings in Bangalore