मिशेल स्टार्क दुखापतीमुळे 'आऊट'; ऑस्ट्रेलियाला धक्का 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

अतिक्रिकेटच्या कारणामुळे स्टार्कने यंदाच्या 'आयपीएल'मधूनही माघार घेतली होती. त्यानंतर पुण्यात झालेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने 61 आणि 30 धावा करत भारतीय संघावर दडपण आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

रांची : पहिल्या दोन कसोटींत भारतीय फलंदाजांना त्रस्त करणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने पायाच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे. यामुळे तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. 

बंगळूर कसोटीमध्ये स्टार्कच्या उजव्या पायाला दुखापत झाली. दुसरी कसोटी संपल्यानंतर स्टार्कवर उपचार करण्यात आले; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे स्टार्क आता मायदेशी परतणार आहे. बॉर्डर-गावसकर करंडकातील उर्वरित दोन सामन्यांसाठी तो उपलब्ध नसेल. यामुळे ही मालिका जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आशांना धक्का बसला आहे. 

अतिक्रिकेटच्या कारणामुळे स्टार्कने यंदाच्या 'आयपीएल'मधूनही माघार घेतली होती. त्यानंतर पुण्यात झालेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने 61 आणि 30 धावा करत भारतीय संघावर दडपण आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही एकाच षटकात अजिंक्‍य रहाणे आणि करुण नायर यांना बाद करत त्याने ऑस्ट्रेलियाला त्यावेळी वर्चस्व मिळवून दिले होते.

डावाच्या सुरवातीला त्याची भेदक गोलंदाजी खेळणे भारतीय सलामीवीरांना अवघड जात होते. आता पुढील दोन कसोटींसाठी स्टार्क उपलब्ध नसल्याने कर्णधार स्टीव्ह स्मिथची डोकेदुखी वाढणार आहे.