सलग दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा पराभव 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

संक्षिप्त धावफलक : 
पाकिस्तान : पहिला डाव : 9 बाद 443 घोषित 
अझर अली नाबाद 205 
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : 8 बाद 624 घोषित 
स्टीव्ह स्मिथ नाबाद 165, डेव्हिड वॉर्नर 144 
पाकिस्तान : दुसरा डाव : सर्वबाद 163 
अझर अली 43, सर्फराज अहमद 43, 
मिशेल स्टार्क 4-36, नॅथन लिओन 3-33, जोश हेझलवूड 2-39

मेलबर्न: अझर अलीचे द्विशतक, पहिल्या डावात चारशेपेक्षा अधिक धावा आणि पावसामुळे वाया गेलेला वेळ अशा सगळ्या जमेच्या बाजू असूनही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानला शेवटच्या दिवशी शेवटच्या तासामध्ये पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यासह तीन कसोटींच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 

पहिल्या डावात 443 धावा करूनही दुसऱ्या डावातील ढिसाळ फलंदाजीमुळे पाकिस्तानला डावाने पराभव स्वीकारावा लागला. मिशेल स्टार्क आणि नॅथन लिओन हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. गॅबामधील पहिल्या कसोटीत पाकिस्तानने झुंजार फलंदाजी केली होती. त्यामुळे मेलबर्नमध्येही अशीच झुंज पाहायला मिळण्याची अपेक्षा होती. पण अझर अलीचा अपवाद वगळला, तर पाकिस्तानने सुरवातीपासूनच सामना जिंकण्यापेक्षा पराभव टाळण्यासाठीच जास्त प्रयत्न केला. यातच दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने योजनाबद्ध गोलंदाजी करत पाकिस्तानवर दडपण आणले. नॅथन लिओनच्या एकाच स्पेलमध्ये त्याने युनूस खान, मिस्बा उल हक आणि असद शफीक या प्रमुख फलंदाजांना बाद करत पाकिस्तानचा प्रतिकार मोडून काढला. 

या सामन्यात पाकिस्तानने पहिला डाव 443 धावांवर घोषित केला होता. पण बेशिस्त आणि प्रभावहीन गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 624 धावांचा डोंगर उभा केला. दुसऱ्या डावात पाकिस्तानची घसरगुंडी उडाल्याने त्यांना एक डाव व 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला 'सामनावीर' घोषित करण्यात आले. 

Web Title: Mitchell Stark, Nathan Lyon scripts dramatic Australia win