महंमद शमी तंदुरुस्त; मग संघाबाहेर कोण जाणार? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

धरमशालाच्या खेळपट्टीचे स्वरूप पाहता येथे तीन वेगवान गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला, तर एक फलंदाज किंवा फिरकी गोलंदाज संघाच्या बाहेर जाऊ शकेल. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने पाच गोलंदाज खेळविले होते. पण त्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सहा फलंदाज, चार गोलंदाज असेच समीकरण ठेवण्यात आले.

धरमशाला: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी चौथ्या आणि निर्णायक कसोटी क्रिकेट सामन्यासाठी संघाचे समीकरण काय असावे, यावर सध्या भारतीय संघ व्यवस्थापनाचा खल सुरू असल्याचे चित्र आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला वेगवान गोलंदाज महंमद शमी या कसोटीसाठी भारतीय संघात दाखल झाला आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर चार गोलंदाज खेळवायचे की पाच, हा सध्या व्यवस्थापनासमोर पेच आहे. 

धरमशालाची खेळपट्टी आणि इथले वातावरणही फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक पोषक आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये भारताने दोन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज खेळविले होते. तीन सामन्यांनंतर दोन्ही संघांमध्ये 1-1 अशी बरोबरी आहे. रांची येथील कसोटी अनिर्णित राहिल्याने धरमशाला येथील चौथी कसोटी निर्णायक ठरणार आहे. 

सामन्याला सुरवात होण्यापूर्वी तीन दिवस या खेळपट्टीवर चांगले गवत होते. अर्थात, या दोन दिवसांत हे गवत बऱ्यापैकी कमी केले जाण्याची शक्‍यता आहे. मात्र तरीही ही खेळपट्टी पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसापासूनच फिरकीला साथ देईल, असे चित्र नाही. यामुळेच या सामन्यासाठीचे भारतीय संघाचे समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. 

यंदाच्या मोसमात महंमद शमी हा भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. तसेच, घरच्या मैदानावर झालेल्या यंदाच्या मोसमातील सर्व कसोटी खेळणारा उमेश यादवलाही चांगला सूर सापडला आहे. त्यामुळे तंदुरुस्त झालेल्या शमीला संघात स्थान देण्यासाठी उमेशला वगळण्याचा विचार संघ व्यवस्थापन करणे अवघड आहे. ईशांत शर्मानेही गेल्या दोन कसोटींमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. अद्याप शमी अधिकृतरित्या भारतीय संघात दाखल झालेला नाही. तरीही सध्या तो भारतीय संघाबरोबर प्रवास करत आहे आणि त्याचा नियमित सरावही सुरू आहे. 

धरमशालाच्या खेळपट्टीचे स्वरूप पाहता येथे तीन वेगवान गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला, तर एक फलंदाज किंवा फिरकी गोलंदाज संघाच्या बाहेर जाऊ शकेल. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने पाच गोलंदाज खेळविले होते. पण त्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सहा फलंदाज, चार गोलंदाज असेच समीकरण ठेवण्यात आले. त्यामुळे धरमशालामध्ये फलंदाजीसाठीही पूरक वातावरण असेल, तर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे एखाद्या फलंदाजाला विश्रांती देण्याचा निर्णय घेऊ शकतात. मात्र, या मालिकेत कोहलीचा सूर हरपला आहे. अजिंक्‍य रहाणेच्या कामगिरीतही सातत्य नाही. त्यामुळे एखादा फलंदाज कमी केल्यास मधली फळी कमकुवत होऊ शकते. 

आर. आश्‍विन आणि रवींद्र जडेजा या दोघांपैकी एकालाही वगळणे शक्‍य होणार नाही. हे दोघेही 'आयसीसी'च्या क्रमवारीत पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. त्यामुळे खेळपट्टी साथ देणारी नसली, तरीही या दोघांचे संघातील स्थान कायम राहील, अशी दाट शक्‍यता आहे. त्यामुळे दोन्ही फिरकी गोलंदाज आणि सहा फलंदाज संघात राहणार असतील, तर महंमद शमीला सामावून घेण्यासाठी ईशांतला बाहेर जावे लागेल. दोन्ही फिरकी गोलंदाज आणि पाच फलंदाज असे समीकरण निवडले, तर करुण नायरला संघाबाहेर जावे लागेल.

Web Title: Mohammad Shami ready to play; Ishant Sharma or Karun Nair to face axe