धोनीने झळकाविले 94 चेंडूत शतक

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

झारखंडची 20 व्या षटकात अवस्था वाईट असताना धोनी फलंदाजीस आला होता. त्याने शाहबाज नदीमच्या साथीने सातव्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी रचली. नदीम 53 धावांवर बाद झाल्यानंतर धोनीने शतकापर्यंत मजल मारली.

नवी दिल्ली - विजय हजारे करंडक स्पर्धेत झारखंडची 6 बाद 57 अशी अवस्था असताना कर्णधार महेंद्रसिंह धोनीने धडाकेबाज खेळी करत 94 चेंडूत शतक झळकावून संघाला सुस्थितीत नेले.

छत्तीसगडविरुद्ध सुरु असलेल्या या सामन्यात धोनीने आज (रविवार) झटपट धावा जमवत शतक झळकाविले. धोनीने 6 बाद 57 वरून संघाचा डाव 243 धावांपर्यंत पोचविला. अखेरच्या षटकात दोन चौकार आणि दोन षटकार खेचले. अखेरच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने 107 चेंडूत 129 धावांची खेळी केली. कॅप्टन कूलची ही खेळी झारखंडसाठी महत्त्वाची ठरली.

झारखंडची 20 व्या षटकात अवस्था वाईट असताना धोनी फलंदाजीस आला होता. त्याने शाहबाज नदीमच्या साथीने सातव्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी रचली. नदीम 53 धावांवर बाद झाल्यानंतर धोनीने शतकापर्यंत मजल मारली. धोनीने मागील कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात 43 धावांची खेळी केली होती. आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदावरून काढल्यानंतर धोनीने विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला होता.