धोनी अजूनही सर्वोत्तम, पंत भविष्याचा चेहरा : प्रसाद

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

धोनी म्हणजे भारतीय संघाची किमती मालमत्ता आहे. कठीण प्रसंगात त्याचा सल्ला फायद्याचा ठरू शकतो. परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची त्याची क्षमता अफलातून आहे आणि मुख्य म्हणजे कोहलीला मार्गदर्शन करण्यासाठी तोच योग्य आहे. 
- एमएसके प्रसाद, भारतीय क्रिकेट निवड समिती अध्यक्ष

नवी दिल्ली : चँपियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केल्यानंतर निवड समिती अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीची शक्‍यता फेटाळून लावताना आजही तो क्रिकेटविश्‍वातील सर्वोत्तम यष्टिरक्षक असल्याचे स्पष्ट केले. 

भारतीय क्रिकेटमध्ये आज 35 वर्षीय धोनीला 19 वर्षीय रिषभ पंतचा पर्याय उपलब्ध असला, तरी तो धोनीचा उत्तराधिकारी म्हणून नावारूपाला येतोय. त्याच्याकडे आम्ही भविष्यातला चेहरा म्हणून बघतोय. जेव्हा धोनी संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा निरोप घेईल, तेव्हा पंतचा मार्ग मोकळा होईल, असेही प्रसाद यांनी सांगितले. 

धोनीच्या फलंदाजीबाबत शंका उपस्थित केली जात असली, तरी निवड समितीचा अजूनही धोनीवर विश्‍वास आहे, असेही मत प्रसाद यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ''संपूर्ण निवड समितीचा धोनीवर विश्‍वास आहे आणि सध्या तरी क्रिकेटविश्‍वातील तोच सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. आपण फक्त त्याच्या फलंदाजीबाबत चर्चा करत आहात, त्याचा अनुभव आणि यष्टिरक्षणाविषयी कुणीच बोलत नाही.'' 

धोनीच्या क्षमतेविषयी प्रश्‍नचिन्ह सातत्याने उपस्थित होत असताना प्रसाद त्याच्या क्षमतेविषयी ठाम होते. ते म्हणाले, ''गेल्या दहा- बारा वर्षांत यष्टिरक्षक म्हणून धोनीला एखादा तरी दिवस खराब गेल्याचे आठवत नाही. आपण त्याच्याकडे फलंदाज म्हणून बघत आलो; पण त्याच्या यष्टीमागील अस्तित्वाची ओळख कुणालाच नाही. माझ्या मते तरी आजच्या युगातही तोच सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे.'' 

धोनीचे कौतुक करताना प्रसाद यांनी पंत यालादेखील गोंजारले. ते म्हणाले, ''पंतने आम्हाला कमालीचे प्रभावित केले आहे. संघरचनेचा भाग म्हणून केवळ त्याला संघात स्थान मिळाले नाही. भविष्याचा विचार करायचा झाला, तर पंतला पर्याय नाही. भविष्यातील क्रिकेटची प्रदीर्घ काळातील गुंतवणूक म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत आहोत.''