मुंबईचा सलग चौथा विजय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

रोहन राजे, अभिषेक नायरच्या भेदकतेनंतर कर्णधार तरेचे नाबाद पाऊण शतक
बडोदा - मुंबईने पश्‍चिम विभागीय ट्‌वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग चौथा विजय मिळविताना महाराष्ट्रास प्रतिकाराचीही फारशी संधी दिली नाही. रोहन राजे आणि अभिषेक नायरने महाराष्ट्राला दीडशेच्या आत रोखले. कर्णधार आदित्य तरेच्या नाबाद पाऊण शतकाने मुंबईचा विजय सुकर केला.

बडोद्यात सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईने सलग चौथ्या विजयासह बाद फेरी निश्‍चित केली. मात्र, महाराष्ट्रासमोरील आव्हान खडतर आहे. महाराष्ट्राची अखेरची साखळी लढत यजमान बडोद्याविरुद्ध होईल.

दुसऱ्या क्रमांकावरील बडोद्याचे आठ, तर महाराष्ट्राचे चार गुण आहेत. महाराष्ट्रास अखेरच्या साखळी लढतीत विजय पुरेसा नाही. सध्या बडोद्याची धावगती +0.327 आहे, तर महाराष्ट्राची -0.164.

अर्धशतकवीर अंकित बावणे आणि निखिल नाईकने चौथ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी करत 3 बाद 27 वरून डाव सावरला होता. हे दोघेही दोन धावांच्या अंतराने बाद झाले. मात्र, त्यानंतर प्रयाग भाटीने अभिषेक नायर आणि रोहन राजे गोलंदाजीपासून दूर झाल्याचा फायदा घेत प्रतिहल्ला केला; पण तो अखेर पुरेसा ठरला नाही.

मुंबईचा सलामीवीर जय बिस्ता तिसऱ्याच चेंडूवर परतला. मात्र, अरमान जाफर आणि श्रेयस अय्यरने 42 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी केली. आदित्य तरे मैदानात उतरल्यावर सामना पूर्ण मुंबईच्या बाजूस झुकला. त्याने श्रेयस अय्यरसह 57 आणि अभिषेक नायरसह 48 धावांची भागीदारी करत मुंबईचा विजय निश्‍चित केला.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र - 7 बाद 148 (अंकित बावणे 50-42 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार, निखिल नाईक 39-27 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार, प्रयाग भाटी नाबाद 24-15 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार, रोहन राजे 3-24, अभिषेक नायर 3-23) पराभूत वि. मुंबई ः 18.4 षटकांत 4 बाद 152 (अरमान जाफर 27, श्रेयस अय्यर 32-40 चेंडूत 3 चौकार, आदित्य तरे नाबाद 71-38 चेंडूत 9 चौकार व 1 षटकार, अभिषेक नायर नाबाद 20).

Web Title: mumbai fourth win 20-20