मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कमाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : 20 षटकांत 8 बाद 142 (बटलर 28 -18 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, किएरॉन पोलार्ड 26 -29 चेंडू, 4 चौकार, हार्दिक पंड्या 24 -23 चेंडू, 2 षटकार, राबाडा 4-0-30-1, अमीत मिश्रा 4-1-18-2, कमिन्स 4-0-20-2) दिल्ली डेअरडेव्हिल्स 20 षटकांत 7 बाद 128 (ख्रिस मॉरिस नाबाद 52 -41 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, कागिसो रबाडा 44 -39 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, मॅक्‍लेघन 4-0-24-3, बुमराह 4-0-21-2).

मुंबई : अवघ्या 142 धावा करूनही मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 14 धावांनी पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमधील सलग सहावा विजय मिळवला. एरवी फलंदाजांच्या जोरावर हुकूमत राखणाऱ्या मुंबईने आज गोलंदाजांच्या शानदार कामिगिरीवर विजय मिळवला.

मुंबईच्या गोलंदाजांनी प्रारंभापासून जशास तसे उत्तर देण्यास सुरवात केली. हार्दिक पंड्याने तरेला धावचीत केल्यानंतर मॅक्‍लेघनने तीन, बुमराहने दोन, तर हार्दिकने एक विकेट घेतली. दिल्लीची सातव्या षटकातच 6 बाद 24 अशी दारुण अवस्था झाली होती, परंतु त्यानंतर मॉरिस आणि रबाडा यांनी 91 धावांची भागीदारी करून सामन्यात रंग भरले होते.

तत्पूर्वी पाच सामन्यांनंतर पहिल्यांदा प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या मुंबईची फलंदाजी चांगल्या सुरवातीनंतर कोलमडू लागली. 37 धावांच्या सलामीनंतर बटलर बाद झाला तेव्हा मुंबईच्या खात्यात 2 बाद 47 धावा जमा झाल्या होत्या, परंतु त्यानंतर ठराविक अंतराने एकेक फलंदाज बाद होत गेले. पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुंबईला 142 धावांपर्यंत मजल मारता आली. फलंदाजी कठीण होत असताना तीन फलंदाज धावचीत झाले.