आयपीएल : 'क्‍लाईफायर-1' मुंबई-पुणे आमनेसामने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

स्टोक्‍सची उणीव जाणवणार 
पुण्याला बेन स्टोक्‍सशिवाय खेळावे लागणार आहे. इंग्लंड संघाच्या सरावासाठी तो मायदेशी परतला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक किमतीला लिलाव झालेल्या या खेळाडूने आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले होते, त्यामुळे संघाचा समतोलही जुळला होता. पुण्यासाठी जयदेव उनडकट आणि शार्दुल ठाकूर या वेगवान गोलंदाजांसह राहुल त्रिपाठीही हुकमी खेळाडू असेल.

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने गटात अव्वल स्थान मिळवले तरी त्यांना ज्या संघाकडून दोन्ही साखळी सामन्यांत पराभव सहन करावा लागला, त्याच पुण्याविरुद्ध त्यांचा 'क्‍लाईफायर-1'मध्ये उद्या सामना होत आहे. दोन्ही पराभवांची परतफेड करून अंतिम फेरीत स्थान मिळवणारा पहिला संघ म्हणून मुंबई सज्ज झाली आहे. 

मुंबई इंडियन्सचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे. याच मैदानावर झालेल्या अखेरच्या सामन्यात मुंबईचा पंजाबकडून पराभव झाला होता, त्याच पंजाबला काल पाणी पाजून पुण्याने बाद फेरी नक्की केली होती; त्यामुळे पुण्याचा आत्मविश्‍वास वाढला आहे. मुंबईनेही प्रमुख राखीव खेळाडूंना संधी देत कोलकात्यावर विजय मिळवला होता, त्यामुळे मुंबईने क्‍लाईफायर-1 सामन्याची तयारी केली आहे. 

वानखेडेच्या खेळपट्टीवरून पुन्हा महाभारत सुरू झाले आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात दोन्ही संघांतील गोलंदाजांची पिटाई झाल्यानंतर हरभजनने ट्विटरवरून संताप व्यक्त केला होता. 'आता गोलंदाजीची मशिनच येथे गोलंदाजी करू शकेल' असे त्याने म्हटले होते. त्यातच सीमारेषाही जवळ घेतली जात असल्यामुळे चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला जातो. मुंबई- पुणे संघांकडे आक्रमक फलंदाज असल्यामुळे उद्याही मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. 

नितीश राणा की रायडू, असा प्रश्‍न मुंबईसमोर असेल. राणाने भरीव कामगिरी करत रायडूला राखीव खेळाडूंत रहाणे भाग पाडले होते; परंतु रायडूने संधी मिळताच कोलकाताविरुद्ध वेगवान अर्धशतक केले. आता या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची, असा प्रश्‍न असताना सौरव तिवारीचाही त्यांना विचार करावा लागेल. गोलंदाजीत मात्र मॅक्‍लेघन, बुमराह, मलिंगा, हरभजन हे प्रमुख खेळाडू संघात परततील.