मुंबई इंडियन्सच्या सीनियर्ससमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

वानखेडे स्टेडियमवर आज हैदराबादशी सामना
मुंबई - तीन दिवसांपूर्वी घरच्या मैदानावर यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्ससमोर गतविजेत्या आणि सलग दोन सामने जिंकणाऱ्या हैदराबादचे आव्हान असेल.

वानखेडे स्टेडियमवर आज हैदराबादशी सामना
मुंबई - तीन दिवसांपूर्वी घरच्या मैदानावर यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्ससमोर गतविजेत्या आणि सलग दोन सामने जिंकणाऱ्या हैदराबादचे आव्हान असेल.

दोन्ही संघांतील नावाजलेल्या खेळाडूंसह नवोदितांचीही कामगिरी उद्याच्या सामन्यात निर्णायक ठरणारी असेल. मुंबई इंडियन्समधील नितीश राणा, पंड्या बंधू लक्षणीय कामगिरी करत आहेत; आयपीएलमध्ये प्रथमच खेळणारा अफगाणिस्तानचा रशिद खान हैदराबादसाठी हुकमी एक्का ठरत आहे. हे नवोदित खेळाडू एकमेकांविरुद्ध कसा खेळ करतात, यावर सर्वांचे लक्ष असेल.

गतवर्षी अडखळणाऱ्या मुंबईला यंदा सलामीला पराभव स्वीकारावा लागला होता. कोलकाताविरुद्ध अखेरच्या षटकात मिळवलेला विजय त्यांना आत्मविश्‍वास उंचावण्यासाठी मोलाचा ठरू शकेल; परंतु फॉर्मात आलेल्या हैदराबादला रोखणे तेवढे सोपे नसेल.

राणा, पंड्या असे नवोदित छाप पाडत असताना रोहित शर्मा, पार्थिव पटेल, किएरॉन पोलार्ड या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आता उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे. त्याच वेळी अखेरच्या षटकातील गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. मलिंगामुळे वाढलेली ताकद समाधान देणारी आहे. फिरकी गोलंदाज कुणाल पंड्या कोलकाताविरुद्ध यशस्वी ठरला होता; पण हरभजनला अपेक्षेएवढा प्रभाव पाडता आला नव्हता. उद्याच्या सामन्यात त्याच्यावरही कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान असेल. उद्या मॅक्‍लेन्घनऐवजी न्यूझीलंडचा टीम साऊदी असा मुंबई संघात बदल अपेक्षित आहे.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला सूर सापडला आहे. त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार हेन्रिकेजही वेगात धावा करत आहे. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात युवराजने तडाखा दिला होता. मात्र, त्याला दुसऱ्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. उद्या वानखेडेवर संधी मिळाल्यास तोही "राज' करण्यास तयार असेल.

Web Title: mumbai indians with hyderabad ipl match