भारत दौऱ्यापूर्वी भरपूर शिकावे लागेल : कूक 

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

उपखंडात फिरकीस अनुकूल खेळपट्टी आहेत, त्यात गैर काहीच नाही. आमच्याकडे कसोटी होतात, त्या वेळी हिरव्यागार खेळपट्ट्या असल्याबद्दल टीका होत असते. आम्ही त्या खेळपट्ट्यांवर क्रिकेट शिकतो, तर बांगलादेशसारखे संघ फिरकीस अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर.

ढाका : बांगलादेशविरुद्धच्या पराभवातून आम्हाला लवकरात लवकर शिकावे लागेल. भारत दौरा लगेचच सुरू होत आहे. आमच्या संघातील गुणवत्तेला अनुभवाची जोड आवश्‍यक आहे, असे इंग्लंड कर्णधार अलिस्टर कूक याने सांगितले. 

बांगलादेश फिरकी जोडीने आपल्याला सतावले, आता त्यापेक्षा सरस असणारे भारतीय फिरकी गोलंदाज जास्तच डोकेदुखी ठरतील, ही चिंताच भेडसावत आहे. फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर 270 धावांचे लक्ष्य सोपे नव्हते, पण चांगली सुरवात झाली होती. पण चहापानानंतर आम्हाला अनुनभवाचा फटका बसला. या वातावरणात खेळण्याच्या अनुनभवाचाच आम्हाला फटका बसत आहे, असे त्याने सांगितले. 

कूक सहकाऱ्यांना या पराभवानंतर जणू भारत दौऱ्यासाठी तयार करीत होता. तो म्हणाला, की उपखंडात फिरकीस अनुकूल खेळपट्टी आहेत, त्यात गैर काहीच नाही. आमच्याकडे कसोटी होतात, त्या वेळी हिरव्यागार खेळपट्ट्या असल्याबद्दल टीका होत असते. आम्ही त्या खेळपट्ट्यांवर क्रिकेट शिकतो, तर बांगलादेशसारखे संघ फिरकीस अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर. आम्हाला याबाबत लवकरात लवकर शिकावे लागेल. आमचा संघ गुणवान आहे. आम्ही यातून योग्य त्या गोष्टी शिकलो तर संघास याचा फायदाच होईल. भारतात फिरकीसमोर खेळणे हे नेहमीच कठीण असते. या पार्श्‍वभूमीवर आम्ही या दौऱ्याकडे अभ्यास दौरा म्हणून बघत होतो, असेही त्याने स्पष्ट केले.