भारताच्या युवा संघाला नेपाळकडून धक्का

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017


आम्ही या विजयाने कमालीचे आनंदीत झालो आहोत. कारण, आतापर्यंत आम्ही कुठल्याच स्तरावर भारतावर विजय मिळविलेला नाही. भारताने आजही चांगली सुरवात केली होती. पण, त्यांना बॅकफूटवर ठेवण्यात आमच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची मोठी कामगिरी होती. याही पेक्षा भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ड्रेसिंगरुमध्ये येऊन आमचे कौतुक केल्याने आमचे खेळाडू अधिक हरखून गेले आहेत. 
- बिनोदकुमार दास, नेपाळचे प्रशिक्षक 

क्वालालंपूर (मलेशिया) : अनेक युवा खेळाडूंना रणजी स्पर्धेत खेळविण्याचा निर्णय घेऊन 19 वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेकडे दुर्लक्ष करण्याचा फटका भारताला सोमवारी बसला. दुबळ्या नेपाळने स्पर्धेतील सर्वांत सनसनाटी विजय नोंदवताना भारताचा 19 धावांनी पराभव केला. 

नेपाळच्या या सनसनाटी विजयात कर्णधार दीपेंद्रसिंग आरी याची अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली. दीपेंद्रच्या 88 धावांच्या खेळीने नेपाळला 8 बाद 185 धावांची मजल मारता आली. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीसमोर भारताचा डाव 1 बाद 95 अशा भक्कम स्थितीतून कोलमडला. दीपेंद्रने 39 धावांत 4 गडी बाद करत भारताचा डाव 166 धावांत गुंडाळण्यात मोलाची कामगिरी बजावली. 

नेपाळच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरवात आक्रमक होती. हिमांशू राणाने नेपाळच्या गोलंदाजांना निष्प्रभ ठरवताना 46 चेंडूंत 38 धावा केल्या. त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. कमलसिंगच्या गोलंदाजीवर तो बाद झाल्यानंतरही डाव भारताच्या हातात होता. त्यांना विजयासाठी 27 षटकांत 96 धावांची गरज होती आणि त्यांचे नऊ गडी बाद व्हायचे होते. 

दीपेंद्रच्या गोलंदाजीला सुरवात झाली आणि सामन्याचे चित्रच पालटले. त्याने अथर्व तायडे याचा अडसर दूर केला आणि भारताच्या डावाला खिंडार पडले. पवन सराफ (2-24) आणि शालाब आलम (2-11) यांनी भारताच्या मधल्या फळीला स्थिरावू दिले नाही. मग वाढलेल्या आवश्‍यक धावगतीच्या दडपणाखाली भारतीय खेळाडू गडबडले. 
नेपाळच्या डावात फलंदाजी करताना दीपेंद्रने दाखवलेला संयम भारतीय फलंदाज दाखवू शकले नाहीत, हाच दोन्ही संघाच्या कामगिरीतील मुख्य फरक ठरला. दहा षटकांत सलामीची जोडी गारद झाल्यानंतरही दीपेंद्रने तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आक्रमकता दाखवत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार ठोकत डावाला वेग दिला. तो निर्णायक ठरला. 

त्यापूर्वी, नेपाळला पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. भारताने मलेशियावर एकतर्फी विजय मिळवून जोशात सुरवात केली होती. भारताचा सामना आता बांगलादेश, तर नेपाळचा मलशियाशी होणार आहे. 
संक्षिप्त धावफलक ः 
नेपाळ 8 बाद 185 (दीपेंद्रसिंग आरी 88, जितेंद्र सिंग 36) वि.वि. भारत सर्वबाद 166 (हिमांशू राणा 36, मनज्योत कालरा 35, दीपेंद्रसिंग 4-39). 

आम्ही या विजयाने कमालीचे आनंदीत झालो आहोत. कारण, आतापर्यंत आम्ही कुठल्याच स्तरावर भारतावर विजय मिळविलेला नाही. भारताने आजही चांगली सुरवात केली होती. पण, त्यांना बॅकफूटवर ठेवण्यात आमच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची मोठी कामगिरी होती. याही पेक्षा भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ड्रेसिंगरुमध्ये येऊन आमचे कौतुक केल्याने आमचे खेळाडू अधिक हरखून गेले आहेत. 
- बिनोदकुमार दास, नेपाळचे प्रशिक्षक