न्यूझीलंडचा डाव 299 धावांत संपुष्टात

वृत्तसंस्था
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

भारतासाठी कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत आर. आश्विन (२११) आता आठव्या स्थानी दाखल झाला आहे. इंदूर कसोटीमध्ये त्याने ईशांत शर्माला (२०८) मागे टाकले.

इंदूर - भारताचा प्रतिभावान फिरकीपटू आर आश्‍विन याने घेतलेल्या सहा बळींमुळे भक्कम सुरुवात केलेल्या न्यूझीलंडचा डाव आज (सोमवार) अखेर 299 धावांत संपुष्टात आला. यामुळे 258 धावांची आघाडी मिळालेल्या भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता पुन्हा एकदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरच्या वृत्तानुसार भारताने बिनबाद 18 धावा केल्या आहेत. 

तत्पूर्वी आश्‍विन याने 27.2 षटकांत अवघ्या 81 धावांत 6 बळी मिळवित न्यूझीलंडचा डाव गुंडाळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली. आश्‍विन याला भारताचा अन्य एक अष्टपैलु खेळाडू असलेल्या रवींद्र जडेजा यानेही 80 धावांत 2 बळी घेत पूरक साथ दिली. सामन्याचा आजचा अवघा तिसरा दिवस असून हाही सामना जिंकण्याची सुवर्णसंधी भारतापुढे निर्माण झाली आहे. 

आज तिसऱ्या दिवशी मार्टीन गुप्टील आणि टॉम लॅथम यांनी सावधपणे फलंदाजी करताना भारतीय जलदगती गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. गुप्टील आणि लॅथम यांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. मात्र, अर्धशतकानंतर लंचला काहीवेळ शिल्लक असताना अश्विनने लॅथमला बाद केले.

लंचनंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फक्त मैदानावर हजेरी लावण्याचे काम केले. अश्विनने कर्णधार विल्यम्सनचा अवघ्या 8 धावांवर त्रिफळा उडविला. त्यापाठोपाठ गुप्टीलही 72 धावांवर धावबाद झाला. रॉस टेलर आणि ल्युक राँची यांनी भोपळाही फोडता आला नाही.

त्यापूर्वी, दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे यांनी धावांचे जेवण करत तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवसअखेरीस न्यूझीलंडविरुद्ध धावांचा डोंगर कधी उभा केला, हे पाहुण्या गोलंदाजांना कळलेदेखील नाही. भारताने दुसऱ्या दिवशी 5 बाद 557 धावांवर आपला पहिला डाव घोषित करून सामन्याची सूत्रे निश्‍चितपणे आपल्या हातात राखली. कर्णधार उपकर्णधार या जोडीने दिवसभर न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांना मैदानावर चौफेर फिरवले. तब्बल 169 षटके टाकून दमछाक झाल्यावर त्यांच्या फलंदाजांनी बिनबाद मजल मारली असली, तरी आता फिरकी गोलंदाजी खेळण्याच्या मर्यादा असणाऱ्या त्यांच्या फलंदाजांना मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे नक्कीच कठीण जाणार आहे. कोहलीने 211 धावांची खेळी केली. रहाणे द्विशतकापासून वंचित राहिला. त्याने 188 धावा केल्या. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 365 धावांची "विराट‘ भागीदारी रचली.