'ओप्पो' टीम इंडियाचे नवे प्रायोजक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई - मोबाईल उत्पादक कंपनी "ओप्पो' भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रायोजक असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी ही घोषणा केली. हा करार 1 एप्रिल 2017 पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल.

मुंबई - मोबाईल उत्पादक कंपनी "ओप्पो' भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रायोजक असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी ही घोषणा केली. हा करार 1 एप्रिल 2017 पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल.

संघाच्या प्रायोजकतेच्या करारानुसार "ओप्पो'ने संघाचे अधिकृत प्रायोजक आणि क्रिकेटपटूंच्या किट्‌सवरील लोगो असे अधिकार मिळविले आहेत. हा करार भारताच्या पुरुष, महिला, भारतीय अ तसे 19 वर्षांखालील संघांसाठी लागू राहील. "ओप्पो'ने जवळपास पूर्वीच्या रकमेपेक्षा चार पट अधिक रक्कम देऊन हे अधिकार मिळविले आहेत.

भारतीय संघाला सध्या स्टार इंडियाचा आर्थिक पुरस्कार होता. त्यांच्याशी असलेला चार वर्षांचा करार गेल्याच महिन्यात संपुष्टात आला. त्याच वेळी त्यांनी आपण करार वाढविण्यास उत्सुक नसल्याचे "बीसीसीआय'ला कळवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीत दिलेल्या निर्णयानंतर "बीसीसीआय'ची क्रिकेटवरील पकड ढिली होत असल्याचे कारण "स्टार'ने दिले होते. यानंतरही "स्टार' इंडियासह एकूण सहा कंपन्यांनी टेंडर भरले होते.

यापूर्वी "स्टार'ने अधिकार मिळविले तेव्हा त्यांनी द्विपक्षीय सामन्यांसाठी 1.5 कोटी आणि आशियाई, तसेच आयसीसी सामन्यांसाठी 60 लाख रुपये असा करार केला होता. करार संपताना "स्टार'ने द्विपक्षीय सामन्यांसाठी 1.9 कोटी, तर आशियाई, आयसीसी सामन्यांसाठी 61 लाख रुपये दिले होते. त्यांनी 2013 मध्ये "सहारा'कडून हे अधिकार मिळविले. त्यानंतर अधिकृतपणे जानेवारी 2014 मधील न्यूझीलंड मालिकेपासून त्यांचे नाव भारतीय संघाच्या जर्सीवर अधिकृतपणे झळकले.

किती मिळणार रक्कम
द्विपक्षीय मालिकेतील सामन्यासाठी 4.1 कोटी
आशियाई तसेच आयसीसीच्या सामन्यांसाठी 1.56 कोटी

क्रिकेट मेड इन चायना
भारतीय क्रिकेट मेड इन चायना झाल्याचा भास आयपीएलचे मुख्य प्रायोजक "व्हिवो' ही मोबाईल कंपनीही चीनची टीम इंडियाचे मुख्य प्रायोजक ठरलेली "ओप्पो' ही कंपनीदेखील चीनची भारतातील सामन्यांचे पुरस्कर्ते असलेल्या "पेटीएम' कंपनीत चीनमधील एका कंपनीचा 25 टक्के हिस्सा

पाच वर्षे भरगच्च कार्यक्रम
- आयसीसीच्या फ्युचर्स टूर प्रोग्रॅमनुसार भारताचा भरगच्च कार्यक्रम
- जून 2017 ते मार्च 2022 या कालावधीत भारत 259 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार
- यामध्ये 62 कसोटी, 152 वन-डे, 45 टी 20 सामन्यांचा समावेश
- यात इंग्लंडमधील 2019 विश्‍वकरंडक, ऑस्ट्रेलियातील 2020 मधील टी- 20 विश्‍वकरंडक सामन्यांचा समावेश
- भारत मायदेशात 14, तर परदेशात 20 मालिका खेळणार

Web Title: oppo new team india sponsor