पाकचा फलंदाज युनूस खानही क्रिकेटमधून निवृत्त

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने 175 धावांची खेळी केली होती. कसोटी कारकिर्दीत 10 हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याला फक्त 23 धावांची गरज आहे. कसोटीत दहा हजार धावा करणारा तो पाकिस्तानचा एकमेव क्रिकेटपटू असेल.

कराची - कर्णधार मिस्बा-उल-हक पाठोपाठ आता पाकिस्तानचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज युनूस खाननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. आगामी वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका त्याच्यासाठी शेवटची मालिका असेल.

कसोटी कारकिर्दीला 2000 मध्ये सुरवात करणाऱ्या 39 वर्षीय युनूस खानने माझी ही शेवटची मालिका असल्याचे म्हटले आहे. निवृत्तीचा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. पण, अखेर हा निर्णय घ्यावा लागला. चाहते मला हा निर्णय घेऊ नको असे म्हणत होते. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात ही वेळ येते. मी माझ्या देशाची सेवा करू शकलो आणि चांगली कामगिरी करून निवृत्ती घेत आहे, असे युनूसने म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने 175 धावांची खेळी केली होती. कसोटी कारकिर्दीत 10 हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याला फक्त 23 धावांची गरज आहे. कसोटीत दहा हजार धावा करणारा तो पाकिस्तानचा एकमेव क्रिकेटपटू असेल. त्याने 53.06 च्या सरासरीने धावा केल्या असून, यामध्ये 34 शतकांचा समावेश आहे. त्याने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 313 धावांची सर्वोच्च खेळी केली होती.