बरं झालं, मॅच लवकर संपली..! : चेतेश्वर पुजारा

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. माझ्या सहकाऱ्यांनी लवकर सामना संपविल्याबद्दल मी आनंदी आहे. मी माझ्या कारकिर्दीतील पहिले शतक याच मैदानावर बनविले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतकही येथेच झळकाविले होते.

हैदराबाद - लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने बांगलादेशविरुद्ध विजयाचे गिफ्ट मिळाल्याचे म्हणत लवकर मॅच संपविल्याबद्दल सहकाऱ्यांचे आभारही मानले आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताला 208 धावांनी विजय मिळविता आला. आज (सोमवार) अखेरच्या दिवशी भारतीय संघाने दुपारच्या सत्रात विजय मिळविला. या मालिकेसह भारताने आपले विजयी अभियान सुरु ठेवले असताना, चेतेश्वर पुजारालाही विजयाचे गिफ्ट दिले आहे.

पुजारा म्हणाला, की आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. माझ्या सहकाऱ्यांनी लवकर सामना संपविल्याबद्दल मी आनंदी आहे. मी माझ्या कारकिर्दीतील पहिले शतक याच मैदानावर बनविले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतकही येथेच झळकाविले होते. पहिल्या डावात मी शतकापासून दूर राहिले. पण, दुसऱ्या डावात उपयुक्त अर्धशतक झळकावू शकलो. सध्या मला चांगली लय सापडली आहे.