पाचशे धावा केलेला पृथ्वी शॉ मुंबई संघात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

तमिळनाडूविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी संधी
मुंबई - सचिन तेंडुलकरची गुणवत्ता ज्याच्यामध्ये पाहिली जाते, ज्याने शालेय क्रिकेटमध्ये तीन वर्षांपूर्वी 546 धावांची विश्वविक्रमी खेळी केली होती, त्या 17 वर्षीय पृथ्वी शॉची मुंबई संघात रणजी करंडक उपांत्य सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे.

तमिळनाडूविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी संधी
मुंबई - सचिन तेंडुलकरची गुणवत्ता ज्याच्यामध्ये पाहिली जाते, ज्याने शालेय क्रिकेटमध्ये तीन वर्षांपूर्वी 546 धावांची विश्वविक्रमी खेळी केली होती, त्या 17 वर्षीय पृथ्वी शॉची मुंबई संघात रणजी करंडक उपांत्य सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे.

यंदाच्या रणजी स्पर्धेत गतविजेत्या मुंबईची उपांत्य सामन्यातील तमिळनाडूविरुद्धची लढत 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. केविन अल्मेडाला वगळून त्याच्याऐवजी पृथ्वी शॉ हा एकमेव बदल मुंबईने केला आहे.

हैदराबादविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात अल्मेडाची कामगिरी फारच सुमार झाली होती. दोन्ही डावांत मिळून केवळ 10 धावा करणाऱ्या केविनने सोपे झेलही सोडले होते. निवड समितीने कर्णधार आदित्य तरे आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याशी चर्चा करून केविनऐवजी हरहुन्नरी पृथ्वी शॉची निवड केली.

2013 मधील हॅरिस ढाल क्रिकेट स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेतून खेळणाऱ्या पृथ्वीने 330 चेंडूंतच 546 धावांची खेळी सादर केली होती. त्यामध्ये त्याने 85 चौकार व पाच षटकार मारले होते. शालेय क्रिकेटमधला हा विश्वविक्रम आहे.

अफाट गुणवत्ता असल्यामुळे त्याला शालेय वयातच परदेशात खेळण्याची संधी मिळाली. ग्लुस्टरशायरच्या द्वितीय श्रेणी संघातून तो इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळला होता. इतकेच नव्हे, तर क्रिकेट साहित्य तयार करणाऱ्या एसजी कंपनीने त्याच्याशी करारही केलेला आहे.

19 वर्षांखालील भारतीय संघातूनही तो खेळलेला आहे. या संघाचे राहुल द्रविड प्रशिक्षक आहेत. या संघाने नुकतेच आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे.

या स्पर्धेतील दोन सामन्यांत मिळवून पृथ्वीने बऱ्याच धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणेची दुखापतीमुळे अनुपस्थिती आणि त्यातच फॉर्मात असलेला सलामीवीर अखिल हेरवाडकर व अनुभवी धवल कुलकर्णी यांची अनुपस्थिती मुंबईला जाणवत आहे.

संघ - आदित्य तरे (कर्णधार), प्रफुल्ल वाघेला, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, अभिषेक नायर, शार्दुल ठाकूर, बलविंदरसिंग संधू, तुषार देशपांडे, रॉस्टन डायस, सुफियान शेख, विजय गोहिल, अक्षय गिरप, एकनाथ केरकर व पृथ्वी शॉ.