'अनहोनी को होनी करदे, नाम है धोनी'; पुण्याचा विजय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

पुणे - 'अनहोनी को होनी करदे, नाम है धोनी' अशी अफलातून कामगिरी करत महेंद्रसिंह धोनीने केलेल्या फटकेबाजीमुळे पुणे सुपर जायंटस संघाने गतविजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघावर 6 गडी राखून विजय मिळविला.

पुणे - 'अनहोनी को होनी करदे, नाम है धोनी' अशी अफलातून कामगिरी करत महेंद्रसिंह धोनीने केलेल्या फटकेबाजीमुळे पुणे सुपर जायंटस संघाने गतविजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघावर 6 गडी राखून विजय मिळविला.

पुण्याचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जयदेव उनाडकट आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जास्त धावा न देता हैदराबादचे स्फोटक सलामीवीर वॉर्नर आणि धवन यांना रोखून ठेवले. या दोघांनी आठव्या षटकात संघाची धावसंख्या 50 पर्यंत पोचविली. मात्र, धवन 30 धावांवर ताहीरचा शिकार ठरला. त्यानंतर केन विल्यम्सनही झटपट धावा बनविण्याच्या प्रयत्नात 21 धावांवर बाद झाला. वॉर्नर अर्धशतक पूर्ण करेल असे वाटत असतानाच 43 धावांवर बाद झाल्यानंतर हेन्रिकेसने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत पुण्याच्या गोलंदाजांवर प्रहार केला. हेन्रिकेसने अर्धशतक पूर्ण करून संघाला 176 धावांपर्यंत पोचविले. त्याने 28 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारासह 55 धावा केल्या. युवराजसिंगला विश्रांती देऊन संघात स्थान दिलेल्या दीपक हुडाने 10 चेंडूत 19 धावा केल्या.

या आव्हानासमोर पुण्याची सुरवात खराब झाली. अजिंक्य रहाणे अवघ्या 2 धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठीने मागील सामन्याप्रमाणे या सामन्यातही आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. त्याने झटपट धावा करत अर्धशतकी खेळी केली. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलेच अर्धशतक होते. स्मिथने सलग दोन षटकार मारून धावा जमाविण्याचा प्रयत्न केला. पण, तो अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्मिथ बाद झाल्यानंतर आलेल्या धोनीने सुरवातीला संयमी फलंदाजी केली. नंतर त्याने आपल्या खेळात गती आणली. 17 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बेन स्टोक्स बाद झाल्यानंतर धोनीला 18 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमारने जिवदान दिले. त्याच षटकात त्याने सिराजच्या गोलंदाजीवर षटकार खेचत संघाला विजयाजवळ नेले. मनोज तिवारीने त्याला चांगली साथ दिली. धोनीनेही यंदाच्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. अखेरच्या षटकात चार चेंडूत सहा धावांची गरज असताना सामना 2 चेंडूत 4 धावांपर्यंत गेला. धोनीने दोन धावा काढून 1 चेंडूत 2 धावांची गरज असताना चौकार खेचून विजय साजरा केला.

Web Title: pune super giants win in ipl cricket match