आश्विनने मोडला डेनिस लिलींचा विक्रम

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या आश्‍विनने सर्वांत वेगवान अडीचशे बळींचा टप्पा ओलांडला. अश्‍विनने डेनिस लिली यांचा 48 कसोटींत केलेला हा विक्रम मोडीत काढला.

हैदराबाद : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन आश्‍विन याने कसोटी कारकिर्दीत सर्वांत वेगवान 250 बळी मिळविण्याची कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज डेनिस लिली यांचा विक्रम मोडीत काढला आहे. 

हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात आश्विनने बांगलादेशचा कर्णधार मुशफिकूर रहिमला बाद करत 45 व्या कसोटीत 250 बळी मिळविण्याची कामगिरी केली. आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या आश्‍विनने सर्वांत वेगवान अडीचशे बळींचा टप्पा ओलांडला. अश्‍विनने डेनिस लिली यांचा 48 कसोटींत केलेला हा विक्रम मोडीत काढला.

आश्विनने नुकतेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने पाच कसोटी सामन्यात 28 गडी बाद केले होते. आश्‍विनने कारकिर्दीत कमी कसोटीत 200 गडी बाद करण्याचाही विक्रम केला आहे. त्याने 37 कसोटींत अशी कामगिरी करताना पाकिस्तानच्या वकार युनूसचा विक्रम मोडीत काढला होता. आश्विनला यंदा आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते.