धोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

2019 विश्‍वकरंडकासाठी आतापासून विचार करण्याची हीच खरी वेळ आहे. निवड समिती संघ व्यवस्थापनाने आता धोनी आणि युवराज दोघेही संघात राहू शकतात की यापैकी एकच याचे उत्तर शोधायचे आहे. संघ बांधणीसाठी आपल्याला जे निर्णय घ्यायचे आहेत ते सोडून अन्य आघाड्यांवरच लक्ष केंद्रित करत आहोत. 
- राहुल द्रविड, भारताचा माजी कर्णधार

नवी दिल्ली - आगामी विश्‍वकरंडक नजरेसमोर ठेवून भारतीय क्रिकेट निवड समितीने ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. विशेषतः महेंद्रसिंह धोनी आणि युवराज यांच्या संघातील भूमिकेबाबत विचार करण्याची गरज असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे. 

भारतीय संघ आता विंडीजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेविषयी बोलताना द्रविड म्हणाला, "या मालिकेत अंतिम अकरा जणांत प्रामुख्याने युवा खेळाडूंना पसंती मिळायला हवी. मुळात विंडीज दौऱ्यासाठी पूर्ण क्षमतेचा संघ घेऊन जाण्याची गरजच नव्हती. भारतीय संघात प्रयोग करण्यासाठी हा दौरा योग्य होता. तुम्हाला जर असे प्रयोग करायचे नसतील, तर तुम्हाला नवी पिढी योग्य वेळी गवसणारच नाही.'' 

राहुल द्रविडने चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील फिरकी गोलंदाजांच्या अपयशावरूनही चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, "चॅंपियन्स स्पर्धेत बहुतेक खेळपट्ट्या फ्लॅट होत्या. अशा खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणे खरंच कठिण असते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जर मधल्या षटकांत विकेट हव्या असतील, तर मनगटी फिरकी गोलंदाज संघात असायलाच हवे. अश्‍विन आणि जडेजा या स्पर्धेत प्रभाव पाडू शकले नाहीत. कुलदीप यादवसारख्या गुणी गोलंदाजाला अधिक संधी मिळायला हवी. त्याच्याकडे अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजांना कोंडीत पकडण्याची क्षमता आहे.'' 

2019 विश्‍वकरंडकासाठी आतापासून विचार करण्याची हीच खरी वेळ आहे. निवड समिती संघ व्यवस्थापनाने आता धोनी आणि युवराज दोघेही संघात राहू शकतात की यापैकी एकच याचे उत्तर शोधायचे आहे. संघ बांधणीसाठी आपल्याला जे निर्णय घ्यायचे आहेत ते सोडून अन्य आघाड्यांवरच लक्ष केंद्रित करत आहोत. 
- राहुल द्रविड, भारताचा माजी कर्णधार