राहुल त्रिपाठीने छाप पाडली - स्मिथ

सुनंदन लेले
शनिवार, 22 एप्रिल 2017

पुणे - ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळूर’विरुद्ध मिळालेल्या विजयाने रायझिंग पुणे सुपर जायंट्‌स संघ पुन्हा एकदा विजयाचा मार्गावर आला आहे. खेळाडूंनी निराशेची मरगळ झटकून टाकली आहे. ‘आयपीएल’चे वेळापत्रक व्यग्र असतानाही पुणे संघाला चार दिवसांची सुटी मिळाल्याने संघातील प्रत्येक खेळाडू ताजातवाना झाल्याने आता घरच्या मैदानावर पुन्हा एकदा विजयाचा जल्लोष करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया पुणे संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने व्यक्त केली. 

स्मिथ म्हणाला, ‘‘आयपीएलमध्ये एखाद्या संघाचे नेतृत्व करणे सोपे नाही. संघातील सर्वच्या सर्व खेळाडूंना कोणताही कर्णधार पूर्ण ओळखत नसतो. त्यामुळे संघाचा समतोल कसा असावा याचा अंदाज येण्यास वेळ लागतो. खास करून पुणे आणि गुजरात संघाला हा प्रश्‍न प्रकर्षाने जाणवत आहे. कारण, हे दोन्ही संघ फक्त दोन वर्षांसाठी स्पर्धेत आले आहेत.’’

सहा सामने झाल्यानंतर आपल्याला संघाचा अंदाज आला असल्याचे स्मिथने सांगितले. तो म्हणाला, ‘‘संघ कसा असावा याचा मला अंदाज आला आहे. गेल्या सामन्यात शार्दुल ठाकूर, जयदेव उनाड्‌कट यांनी सुरेख गोलंदाजी केली. पण, खरी छाप राहुल त्रिपाठीने पाडली. त्याने आपल्या फलंदाजीची झलक दाखवून दिली आहे. रहाणेला तो चांगली साथ देत आहे. त्यामुळे आमचा सलामीचा प्रश्‍न सुटला असे म्हणण्यास जागा आहे.’’

स्पर्धेत उद्या शनिवारी पुणे संघाची गाठ सनरायझर्स हैदराबादशी पडणार आहे. त्याबद्दल स्मिथ म्हणाला, ‘‘हैदराबादची ताकद त्यांच्या गोलंदाजीत आहे. भुवनेश्‍वर चांगला मार करत आहे. विशेष म्हणजे रशिद खानची त्याला सुरेख साथ मिळत आहे. आम्हाला यश मिळवायचे असेल, तर फलंदाजी भक्कम ठेवावी लागेल. धोनीच्या अपयशाची चर्चा नको, तो असा खेळाडू आहे, की केव्हाही फॉर्ममध्ये परतू शकतो.’’