4 षटकांत एकही धाव न देता घेतले 10 बळी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

राजस्थानचा 15 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज आकाश चौधरी याने सर्वांना आश्चर्य वाटेल अशी कामगिरी करून दाखविली आहे. 4 षटकांमध्ये 4 निर्धाव षटके, एकही धाव नाही आणि दहा बळी होय हे विश्वास न बसण्यासारखी कामगिरी आकाशने केली आहे.

जयपूर - फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या ट्वेंटी-20 प्रकारामध्ये चक्क एका गोलंदाजाने 4 षटकांमध्ये एकही धाव न देता अख्खा संघ बाद करण्याची अफलातून कामगिरी करून दाखविली आहे.

राजस्थानचा 15 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज आकाश चौधरी याने सर्वांना आश्चर्य वाटेल अशी कामगिरी करून दाखविली आहे. 4 षटकांमध्ये 4 निर्धाव षटके, एकही धाव नाही आणि दहा बळी होय हे विश्वास न बसण्यासारखी कामगिरी आकाशने केली आहे. जयपूरमध्ये खेळविण्यात येत असलेल्या भंवरसिंह ट्वेंटी-20 स्पर्धेमध्ये त्याने दिशा क्रिकेट अकादमीकडून खेळताना दहा बळी मिळविले.

पर्ल अकादमीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दिशा क्रिकेट अकादमीला 20 षटकात त्यांनी 155 धावांत रोखले. 156 धावांचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात पर्ल अकादमीचा अख्खा संघ आकाश चौधरीच्या गोलंदाजीसमोर अवघ्या 36 धावांमध्ये गारद झाला. पहिल्या षटकात आकाशने दोन बळी घेतली. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात त्याने पुन्हा दोन बळी घेतले. त्यानंतर आपल्या चौथ्या षटकात त्याने चार विकेट घेतल्या. याच हॅटट्रीकचाही समावेश होता. 2002 मध्ये जन्मलेला आकाश हा राजस्थान-उत्तर प्रदेश सीमेजवळील भरतपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे.