नदीमची फिरकी अन्‌ किशनची फटकेबाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

हरियानावर पाच गडी राखून विजय, झारखंड उपांत्य फेरीत
बडोदा - शाहबाज नदीमची फिरकी आणि त्यानंतर इशान किशनच्या फटकेबाजीमुळे झारखंडने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशीच हरियानाचा पाच गडी राखून पराभव केला.

हरियानावर पाच गडी राखून विजय, झारखंड उपांत्य फेरीत
बडोदा - शाहबाज नदीमची फिरकी आणि त्यानंतर इशान किशनच्या फटकेबाजीमुळे झारखंडने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशीच हरियानाचा पाच गडी राखून पराभव केला.

झारखंडने यापूर्वी 2005-06च्या मोसमात "प्लेट' विभागाची उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, स्पर्धेच्या इतिहासात ते प्रथमच मुख्य स्पर्धेची उपांत्य लढत खेळणार आहेत.

चौथ्या दिवसअखेरीस हरियानाने 59 धावांची आघाडी मिळविली होती. त्यांच्या आठ विकेट बाकी होत्या. पण, नदीम आणि समर काद्री या झारखंडच्या फिरकी दुकलीसमोर त्यांचा डाव 2 बाद 178 अशा भक्कम स्थितीतून अवघ्या दहा षटकांत 7 बाद 193 असा गडगडला. पहिल्या डावात सात गडी बाद करणाऱ्या नदीमने दुसऱ्या डावात 78 धावांत 4 गडी बाद केले. काद्रीने 75 धावांत 3 गडी बाद करून त्याला सुरेख साथ केली. या मोसमात नदीमने दुसऱ्यांदा सामन्यात दहा किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले.

हरियानाचा दुसरा डाव 262 धावांत आटोपला. विजयासाठी झारखंडसमोर 176 धावांचे आव्हान होते. किशनने फटकेबाजी करून झारखंडचा विजय सुकर केला. त्याने 61 चेंडूंत नऊ चौकार आणि सहा षटकारांसह 86 धावांची खेळी केली. त्याने आनंद सिंग आणि विराट सिंग यांच्यासह षटकामागे पाचच्या धावगतीने भागीदारी केल्या. तो बाद झाला तेव्हा झारखंडच्या 24 षटकांत 139 धावा झाल्या होत्या. त्यानंतर केवळ सात षटकांत झारखंडने विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक
हरियाना 258 आणि 262 (चैतन्य बिष्णोई 52, शुभम रोहिला 43, नितीन सैनी 41, शिवम चौहान 43, शाहबाज नदीम 4-78, समर काद्री 3-75) पराभूत वि. झारखंड 345 आणि 5 बाद 178 (इशान किशन 86, विराट सिंग 21, आनंद सिंग 27, कौशल सिंग नाबाद 12, यजुवेंद्र चहल 2-43, संजय पहल 2-36)

Web Title: ranaji karandak competition