रोहित शर्माला आणखी संधी; संघ कायम

वृत्तसंस्था
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

संघ पुढीलप्रमाणे -

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के. एल. राहुल, शिखर धवन, मुरली विजय, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, महंमद शमी, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, अमित मिश्रा, उमेश यादव.

मुंबई - मायदेशातील भरगच्च मोसमाची सुरवात होणाऱ्या न्यूझीलंड-विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आज (सोमवार) भारतीय संघाची निवड झाली असून, रोहित शर्माला पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या विजयी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

 

एकदिवसीय क्रिकेटमधील भरवशाचा; परंतु कसोटीत अपयशी ठरत असलेल्या रोहित शर्मावर कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निवडलेल्या 15 सदस्यीय संघात शिखर धवन, के. एल. राहुल आणि मुरली विजय या तीन सलामीवीरांना संधी देण्यात आलेली आहे. तर, फिरकीपटू म्हणून आर. अश्विन आणि अमित मिश्रालाच पसंती देण्यात आली आहे. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके आणि एकाच डावात सर्वाधिक खेळी करण्याचा विक्रम असलेल्या रोहितला आपल्यातील गुणवत्तेला कसोटी क्रिकेटमध्ये न्याय देता आलेला नाही. २०१३ मध्ये कसोटी पदार्पण करताना सलग दोन शतके झळकावल्यानंतर रोहितला आपले स्थान पक्के करता आले नाही. आता त्याला आणखी एक संधी मिळाली आहे. वेस्ट इंडीजमधील मालिकेतील चारपैकी दोन कसोटींत त्याला संधी देण्यात आली होती. या निवडीवेळी गौतम गंभीर, श्रेयस अय्यर, मयांक अग्रवाल यांचा विचार होण्याची शक्यता होती. पण, या खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही.

मायदेशात भारत १३ कसोटी सामने खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे. हा भरगच्च कार्यक्रम लक्षात घेऊनही निवड समितीने संघात नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली नाही. वेस्ट इंडीजमध्ये खेळलेल्या संघातील वेगवान गोलंदाजीत बदल करण्यात आलेला नाही. महंमद शमी, ईशांत शर्मा, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव यांना कायम ठेवण्यात आलेले आहे.