पुण्याचा बंगळूरवर एकतर्फी विजय

सचिन निकम
शनिवार, 29 एप्रिल 2017

पुणे : फलंदाजीस अवघड असलेल्या खेळपट्टीवर रायझिंग पुणे सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर 61 धावांनी एकतर्फी विजय मिळविला. पुण्याच्या 157 धावांच्या आव्हानासमोर बंगळूरचा संघ अवघ्या 96 धावा करू शकला. बंगळूरच्या फलंदाजांची खराब कामगिरी या सामन्यातही पाहायला मिळाली. कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक (55 धावा) व्यर्थ ठरले.

पुणे : फलंदाजीस अवघड असलेल्या खेळपट्टीवर रायझिंग पुणे सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर 61 धावांनी एकतर्फी विजय मिळविला. पुण्याच्या 157 धावांच्या आव्हानासमोर बंगळूरचा संघ अवघ्या 96 धावा करू शकला. बंगळूरच्या फलंदाजांची खराब कामगिरी या सामन्यातही पाहायला मिळाली. कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक (55 धावा) व्यर्थ ठरले.

रायझिंग पुणे सुपर जायंट्‌सने दिलेले 158 धावांच्या आव्हानासमोर बंगळूरची सुरवात खराब झाली. गेलच्या जागी संघात स्थान मिळालेल्या ट्रव्हिस हेडला उनाडकटने 2 धावांवर त्रिफळाबाद केले. यंदाच्या आयपीएलमध्ये आपली चमक दाखवू न शकलेला एबी डिव्हिलर्सही 3 धावांवर तिवारीकडे झेल देऊन बाद झाला. लोकल बॉय केदार जाधवकडून बंगळूरला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. त्याने ख्रिस्तियनला चौकार मारून आपला इरादे स्पष्ट केले होते. पण, फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर विराट आणि केदारमध्ये धाव घेण्याच्या प्रयत्नात झालेल्या चुकीमुळे केदारला 7 धावांवर धावबाद व्हावे लागले. सचिन बेबीही कमाल करू शकला नाही. त्याचा स्मिथने चतुराईने झेल टिपला. 

कोहली एका बाजूने धावा करत असताना त्याला समोरून साथ मिळाली नाही. बिन्नी चुकीचा फटका मारून 1 धावेवर बाद झाला. बंगळूरचा अर्धा संघ 48 धावा असताना पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यामध्ये कोहलीच्या 31 धावा होत्या. नेगीने कोहलीला साथ देण्याचा प्रयत्न केला, मात्र 13 व्या षटकात 3 धावांवर झेल देऊन तोही बाद झाला. मिल्नच्या साथीने कोहलीने पुण्याच्या गोलंदाजांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, तो अपुरा ठरला. विराटने षटकार खेचून 42 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे बंगळूरचा संघ 96 धावाच करू शकला.

त्यापूर्वी बंगळूर रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीची दोन षटके संथ फलंदाजी करणारे पुण्याचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि राहुल त्रिपाठी यांनी तिसऱ्या षटकापासून धावांची गती वाढविण्यास सुरवात केली. तिसऱ्या षटकात ऍडम मिल्नच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार मारून त्रिपाठीने धावसंख्या वाढविली. पण, त्याच्या पुढील षटकात सॅम्युएल बद्रीच्या गोलंदाजीवर रहाणेच्या रुपाने पुण्याला पहिला झटका बसला. रहाणे अवघ्या 6 धावांवर बाद झाला. कर्णधार स्मिथने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत त्रिपाठीला साथ दिली. अरविंदच्या गोलंदाजीवर त्रिपाठीनेही 98 मीटर षटकार खेचत अर्धशतकाकडे वाटचाल केली. मात्र, तो 37 धावांवर नेगीच्या गोलंदाजीवर बाद झाला. धोनीऐवजी मनोज तिवारी फलंदाजीमध्ये बढती देण्यात आली. तिवारीने अखेरपर्यंत फलंदाजी करत संघाची धावसंख्या दीडशेच्या पार नेली. त्याला स्मिथ 45 धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या धोनीने 17 चेंडूत 21 धावा करत साथ दिली. तिवारीने 35 चेंडूत 44 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक :
रायझिंग पुणे सुपर जायंट्‌स : 20 षटकांत 3 बाद 157 (राहुल त्रिपाठी 28 चेंडूत 37 धावा, स्टिव्ह स्मिथ 32 चेंडूत 45 धावा, मनोज तिवारी 35 चेंडूत 44 धावा, महेंद्रसिंह धोनी 17 चेंडूत 21 धावा, सॅम्युएल बद्री 1-31, पवन नेगी 1-18, स्टुअर्ट बिन्नी 1-17)
 

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : 20 षटकांत 9 बाद 96 (विराट कोहली 47 चेंडूत 55 धावा, लॉकी फर्ग्युसन 2-5, इम्रान ताहीर 3-18, वॉशिंगट्न सुंदर 1-7)