आयपीएल: 'दिल्ली' स्पर्धेबाहेर; कोण गाठणार बाद फेरी?

टीम ई सकाळ
मंगळवार, 9 मे 2017

यंदाच्या 'आयपीएल'मध्ये आता केवळ सातच साखळी सामने शिल्लक आहेत. 'मुंबई इंडियन्स'वगळता बाद फेरीमध्ये अन्य तीन जागांसाठी चुरस आहे. 

तरुण आणि गुणवान खेळाडूंवर अवलंबून असलेल्या 'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या संघाला 'आयपीएल'च्या दहाव्या मोसमाची बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीतून अखेर बाहेर पडावे लागले. यंदाच्या मोसमामध्ये दिल्लीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता आणि याचाच फटका त्यांना बसला. आतापर्यंत 'आयपीएल-10'मध्ये केवळ 'मुंबई इंडियन्स'ने बाद फेरीतील स्थान निश्‍चित केले आहे. 

यंदाच्या 'आयपीएल'मध्ये आता केवळ सातच साखळी सामने शिल्लक आहेत. 'मुंबई इंडियन्स'वगळता बाद फेरीमध्ये अन्य तीन जागांसाठी चुरस आहे. 

मुंबई इंडियन्स : (12 सामन्यांत 9 विजय; 18 गुण) 
'आयपीएल'च्या गेल्या आठ मोसमांपैकी सात वेळा मुंबईने बाद फेरी गाठली आहे. पण बहुतांश वेळा त्यांना शेवटच्या सामन्यापर्यंत बाद फेरी गाठण्याची प्रतीक्षा करावी लागली होती. यावेळी त्यांनी सुरवातीपासूनच सातत्यपूर्ण कामगिरी करत बाद फेरीतील स्थान निश्‍चित केले आहे. आता पहिल्या दोन संघांमध्ये राहण्यासाठी त्यांना निव्वळ धावगतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. 'कोलकता नाईट रायडर्स' आणि 'रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स'ने त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले, तर निव्वळ धावगतीमुळे मुंबईला तिसऱ्या स्थानावर जावे लागू शकेल. 

कोलकता नाईट रायडर्स : (12 सामन्यांत 8 विजय; 16 गुण) 
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर दणदणीत विजय मिळवून कोलकत्याने निव्वळ धावगती उंचावत बाद फेरी गाठण्याच्या लक्ष्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. आता अंतिम चार संघांमध्ये दाखल होण्यासाठी कोलकत्याला एकाच विजयाची गरज आहे आणि त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. अर्थात, हे उर्वरित दोन्ही सामने कोलकत्याने गमावले, तरीही बाद फेरी गाठण्याची संधी त्यांना असेल. 'सनरायझर्स हैदराबाद' किंवा 'किंग्ज इलेव्हन पंजाब'ला त्यांच्या शिल्लक सामन्यांपैकी एका सामन्यात जरी पराभव स्वीकारावा लागला, तरीही कोलकता बाद फेरीत दाखल होईल. निव्वळ धावगतीच्या जोरावर कोलकत्याला पहिल्या दोन संघांमध्येही स्थान मिळू शकते. 

रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स : (12 सामन्यांत 8 विजय; 16 गुण) 
यंदाच्या 'आयपीएल'मधील पहिल्या चार सामन्यांमध्ये पुण्याच्या संघाला तीन पराभव स्वीकारावे लागले होते. त्यानंतर पुण्याच्या संघाने कामगिरी उंचावत बाद फेरीच्या दिशेने भक्कम वाटचाल केली आहे. गेल्या आठ सामन्यांमध्ये पुण्याने सात विजय मिळविले आहेत. उर्वरित दोन सामन्यांपैकी एका सामन्यातही विजय मिळविला, तरीही पुण्याचे बाद फेरीतील स्थान निश्‍चित होईल. तसेच, हैदराबाद किंवा पंजाबचा एका सामन्यातही पराभव झाला, तरीही पुण्याचा संघ अंतिम चारमध्ये जाऊ शकेल. 

सनरायझर्स हैदराबाद : (13 सामन्यांत 7 विजय; 15 गुण) 
बलाढ्य मुंबईला पराभूत करून हैदराबादने बाद फेरी गाठण्याची आशा कायम राखली. आता त्यांचा एकच सामना शिल्लक आहे. गुजरात लायन्सविरुद्धच्या या सामन्यात हैदराबादने विजय मिळविला, तर ते बाद फेरीत जातील. पंजाबच्या उर्वरित तीन सामन्यांपैकी एका सामन्यातही त्यांचा पराभव झाला, तरीही हैदराबादला संधी मिळेल. पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी हैदराबादने गुजरातवर विजय मिळविणे आणि कोलकता व पुण्याने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने गमावणे गरजेचे असेल. 

किंग्ज इलेव्हन पंजाब : (11 सामन्यांत 5 विजय; 10 गुण) 
पंजाबसाठी आता उर्वरित तीनही सामन्यांत विजय मिळविणे अत्यावश्‍यक आहे. पण तीनही सामने हे कोलकता, मुंबई आणि पुणे या सध्याच्या ताकदवान संघांविरुद्ध आहेत. स्पर्धेतून बाहेर पडलेल्या गुजरातकडून झालेला पराभव पंजाबसाठी धोकादायक ठरला. 

दिल्ली डेअरडेव्हिल्स : (11 सामन्यांत 4 विजय; 8 गुण) 
हैदराबादने मुंबईचा पराभव केल्यामुळे दिल्लीच्या संघाच्या आशा संपुष्टात आल्या. 'आयपीएल'ला सुरवात होताना ज्या मूळ आठ फ्रॅंचायझी होत्या, त्यापैकी दिल्ली आणि बंगळूरच्याच संघाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळविता आलेले नाही. किंबहुना, दिल्लीला एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. दिल्लीचे तीन सामने शिल्लक आहेत. हे तीनही जिंकले, तरीही त्यांना जास्तीत जास्त पाचव्या क्रमांकापर्यंत झेप घेता येईल. 

गुजरात लायन्स : (12 सामन्यांत 4 विजय; 8 गुण) 
गेल्या 'आयपीएल'मध्ये गुजरातच्या संघाने साखळी फेरीत अव्वल स्थान मिळविले होते. पण यंदा त्यांना दोन सामने शिल्लक असतानाच स्पर्धेबाहेर पडावे लागले. आता दोन्ही सामने जिंकले, तरीही त्यांच्या स्थानावर परिणाम होणार नाही. पुढच्या 'आयपीएल'मध्ये गुजरातच्या संघाला स्थान नसेल, असे आतापर्यंतच्या घडामोडींवरून नक्की आहे. त्यामुळे शेवटचे दोन सामने जिंकून तरी सुखद समारोप करण्याची गुजरातच्या संघाची इच्छा असेल. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : (13 सामन्यांत 2 विजय; 5 गुण) 
विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलर्स, शेन वॉटसनसारखे तगडे खेळाडू असतानाही बंगळूरला सर्वच स्पर्धांमध्ये अपयशाचा सामना करावा लागला. आतापर्यंत बंगळूरला एकदाही विजेतेपद मिळविता आलेले नाही. स्पर्धेच्या सुरवातीच्या टप्प्यात विराट कोहली आणि डिव्हिलर्स दुखापतींमुळे संघाबाहेर होते. त्यांच्या अनुपस्थितीत बंगळूरला चांगली सुरवात करता आली नाही आणि नंतरही लय सापडलीच नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत प्रथमच बंगळूरला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

Web Title: Scenario for IPL 10 play offs; Delhi crashed out of tournament