स्टिव्ह स्मिथच्या अखिलाडु वृत्तीमुळे संताप...

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

'डीआरएससंदर्भातील आम्ही सातत्य राखू शकलेलो नाही. मात्र यासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही मैदानावरच घेतले आहेत. आम्ही ड्रेसिंग रुमकडे संकेतांच्या अपेक्षेने पाहिलेले नाही,' अशी उपहासात्मक प्रतिक्रिया भारतीय कर्णधाराने या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली

बंगळूर - कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमक नेतृत्वाखाली खेळताना भारताने आज (मंगळवार) ऑस्ट्रेलियास दुसऱ्या कसोटी सामन्यात 75 धावांनी पराजित केले. मात्र, भारताच्या नेत्रदीपक कामगिरीने गाजलेल्या आजच्या दिवसास ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ याच्या गैरवर्तनाचे गालबोट लागले.

ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या एकविसाव्या षटकांत स्मिथ हा भारतीय जलदगती गोलंदाज उमेश यादव याच्या गोलंदाजीवर पायचीत असल्याचा निर्णय पंचांकडून देण्यात आला. "डीआरएस' व्यवस्था वापरण्याचा एक पर्याय ऑस्ट्रेलियाकडून त्याआधीच वापरण्यात आला होता. यामुळे या निर्णयाविरोधात दाद मागावी अथवा नाही, अशा विचारात स्मिथ होता. यासंदर्भात, प्रथम त्याने "नॉन स्ट्राईकिंग एंड'ला असलेल्या पीटर हॅंड्‌सकॉम्ब याच्याशी चर्चा केली. मात्र यानंतर डीआरएसचा निर्णय विचारण्यासाठी स्मिथ चक्क ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रुमकडे पाहू लागला.

यावेळीच, पंच नायजेल लॉंग यांनी त्याला तत्परतेने रोखत असे करता येणार नाही, अशी समज दिली. पंचांच्या इशाऱ्यानंतर स्मिथ मुकाट्याने मैदानाबाहेर पडला. मात्र तोपर्यंत त्याची अखिलाडु वृत्ती स्पष्ट झाली होती. या प्रकाराने संतप्त झालेल्या भारतीय कर्णधारानेही या प्रकरणी पंचांशी चर्चा केली. याचवेळी कोहली व स्मिथ यांच्यामध्ये पुन्हा एकदा बाचाबाचीही झाली. डीआरएस व्यवस्थेच्या नियमावलीमध्ये हा पर्याय वापरताना ड्रेसिंग रुममधून कोणताही संकेत देण्यात येऊ नये, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

बीसीसीआयकडून नाराजी
स्मिथ याच्या या कृत्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मिथ याने ड्रेसिंग रुममधून संकेत मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट करत डीआरएस याचा अर्थ (फुलफॉर्म) ड्रेसिंग रुम रिव्ह्यू सिस्टीम असा आहे काय, अशी संतप्त विचारणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.

स्मिथने माफी मागितली
यानंतर, या प्रकरणानंतर वरमलेल्या स्मिथ याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. "माझ्याकडून असे कृत्य व्हावयास नको होते; मात्र थोडा गोंधळ उडाल्याने असे झाले,' असे घडल्या प्रकाराबद्दल माफी मागत स्मिथ याने म्हटले आहे.

आम्ही असे कदापि करणार नाही: कोहली
सामन्यामधील विजयानंतर बोलताना कोहली यानेही या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. ""डीआरएससंदर्भातील आम्ही सातत्य राखू शकलेलो नाही. मात्र यासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही मैदानावरच घेतले आहेत. आम्ही ड्रेसिंग रुमकडे संकेतांच्या अपेक्षेने पाहिलेले नाही,'' अशी उपहासात्मक प्रतिक्रिया भारतीय कर्णधाराने या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली.

"मी फलंदाजी करतानाही हा प्रकार मी दोनदा पाहिला. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू डीआरएससंदर्भात संकेताच्या अपेक्षेने ड्रेसिंग रुमकडे पाहताना मला आढळले आहेत. हा प्रकार थांबावयास हवा, असे मी पंचांना सांगितले होते. मला "तो' शब्दप्रयोग करायचा नाही. मात्र हे कृत्य त्याचेच निदर्शक होते. क्रिकेटच्या मैदानावर माझ्याकडून असे कृत्य कदापि होणार नाही,'' असे कोहली याने "चिटींग' या शब्दाचा उल्लेख न करता स्पष्ट केले.

पडसाद:
दरम्यान, स्मिथ यांच्या या अशोभनीय वर्तनाचे पडसाद उमटू लागले आहेत. भारतीय कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली. स्मिथचे वर्तन पाहून अत्यंत निराश झालो असून त्याचे हे वागणे क्रिकेट खेळताना अपेक्षित असलेल्या खिलाडु वृत्तीच्या पूर्णतः विरुद्ध होते, अशी भावना लक्ष्मण याने व्यक्त केली आहे.

Web Title: Smith in DRS controversy