स्मिथ, मॅक्‍सवेलमुळे दिवस अखेर ऑस्ट्रेलिया 299/4

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मार्च 2017

मालिकेत आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये फलंदाजीसाठी सर्वोत्कृष्ट खेळपट्टी मिळाल्याचा स्मिथ याने पुरेपुर फायदा उठविला. स्मिथ याच्यासह मॅक्‍सवेल यानेही फारसा धोका न पत्करता सहजसुंदर फलंदाजी करण्यात यश मिळविले

रांची - कर्णधार स्टीव्ह स्मिथ (117 धावा - 244 चेंडू) व ग्लेन मॅक्‍सवेल (82 धावा - 147 चेंडू) यांच्या 159 धावांच्या अखंड भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने आज (गुरुवार) भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी अवघे 4 गडी गमावित 299 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळविले.

दुसऱ्या कसोटी सामन्यात डीआरएस व्यवस्थेचा कौल घेण्यासंदर्भातील वादग्रस्त कृतीमुळे प्रचंड टीकेचे लक्ष्य झालेल्या स्मिथ याने आज भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवित नेत्रदीपक फलंदाजी केली. मालिकेत आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये फलंदाजीसाठी सर्वोत्कृष्ट खेळपट्टी मिळाल्याचा स्मिथ याने पुरेपुर फायदा उठविला. स्मिथ याच्यासह मॅक्‍सवेल यानेही फारसा धोका न पत्करता सहजसुंदर फलंदाजी करण्यात यश मिळविले. या दोघांच्या दमदार भागीदारीमुळे एकवेळ 4 बाद 140 अशा अडचणीत सापडलेल्या ऑस्ट्रेलियाने दिवस अखेर भक्कम धावसंख्या उभारण्यात यश मिळविले.

तत्पूर्वी, मॅट रेनशॉ (44 धावा - 69 चेंडू) व डेव्हिड वॉर्नर (19 धावा - 26 चेंडू) या सलामीवीरांनी अर्धशतकी सलामी देत ऑस्ट्रेलियाचा डावाचा पाया रचला. रेनशॉ याला जलदगती गोलंदाज उमेश यादव कर्णधार विराट कोहलीकरवे झेलबाद केले; तर वॉर्नर याला फिरकीपटू रवींद्र जडेजा याने त्याच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. याशिवाय, रवीचंद्रन आश्‍विन यानेही शॉन मार्श याला अवघ्या दोन धावांवर बाद करण्यात यश मिळविले. भारतीय फिरकीपटूंना आज खेळपट्टीची साथ न मिळाल्याने बळी मिळविण्यासाठी विशेष परिश्रम करावे लागले.

मात्र यादव याने केलेली जिगरबाज गोलंदाजी भारतीय गोलंदाजीचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. विशेषत: यादव याचा पीटर हॅंड्‌सकॉंब (19 धावा - 47 चेंडू) याला पायचीत करणारा सुरेख इनस्विंग यॉर्कर हा आजच्या दिवसामधील सर्वांत सुंदर चेंडूंपैकी एक होता.

या सामान्याच्य माध्यमामधून रांची कसोटी केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत आहे. भारतामधील हे 26 वे कसोटी केंद्र ठरले आहे. दोन कसोटी सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. खेळपट्टीचे सध्याचे स्वरूप लक्षात घेता नाणेफेकीचा कौल आणि पर्यायाने पहिल्या डावातील खेळ महत्त्वपूर्ण होता. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. 

संघातील बदल
तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात एकच बदल करण्यात आला. दुखापतीतून बऱ्या झालेल्या मुरली विजयला संघात स्थान मिळाले. त्यासाठी अभिनव मुकुंदला बाहेर बसावे लागले. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघात दोन बदल करण्यात आले आहेत. स्टार्क जखमी झाल्याने पॅट कमिन्सला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, ग्लेन मॅक्‍सवेलला संधी देण्यात आली आहे.

Web Title: Smith, Maxwell put Australia in commanding position