दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर 142 धावांनी विजय

पीटीआय
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

दुखापतींचा फटका ऑस्ट्रेलियालाच
या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांतील खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स आणि हाशिम आमला या दोन भरवशाच्या फलंदाजांना या मालिकेस मुकावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही दुखापतीमुळे बाहेर आहे. मात्र, पहिल्या दोन सामन्यांतील कामगिरी पाहता, या दुखापतींचा फटका ऑस्ट्रेलियालाच जास्त बसला आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी कमकुवत ठरली होती. दुसरीकडे क्विंटन डिकॉक, रिली रॉसू, फाफ डू प्लेसिस आणि जेपी ड्युमिनी यांनी फलंदाजीत डिव्हिलियर्स आणि आमला यांची उणीव जाणवू दिलेली नाही. या विजयामुळे पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

जोहान्सबर्ग: कर्णधार फाफ डू प्लेसिसचे शतक आणि रिली, रॉसू, जेपी ड्युमिनीच्या भरीव योगदानामुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही काल (रविवार) 142 धावांनी दणदणीत विजय मिळविला. जवळपास सर्वच फलंदाजांच्या उपयुक्त योगदानामुळे दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 361 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा डाव 38 षटकांतच 219 धावांवर संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिल्या सामन्यातील शतकवीर क्विंटन डिकॉक या सामन्यात लवकर बाद झाला. पण त्यानंतर रॉसू आणि डू प्लेसिस यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. 25 व्या षटकात रॉसू बाद झाला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 146 धावा केल्या होत्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ड्युमिनीनेही घणाघाती फलंदाजी केली. त्याने 58 चेंडूंतच 82 धावा केल्या. अखेरच्या दहा षटकांमध्ये ड्युमिनी, डू प्लेसिस झटपट बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेची धावगती काहीशी संथ झाली.

362 धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरवात पुन्हा एकदा खराब झाली. ऍरॉन फिंच दुसऱ्याच षटकात बाद झाला. स्मिथ आणि जॉर्ज बेलीही खास कामगिरी करू शकले नाहीत. अकराव्या षटकात बेली बाद झाला, तेव्हा ऑस्ट्रेलियाची स्थिती तीन बाद 55 अशी झाली होती. षटकागणिक वाढत जाणाऱ्या आवश्‍यक धावगतीचे दडपण ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पेलू शकले नाहीत. डेव्हिड वॉर्नर (50) आणि ट्रॅव्हिस हेड (51) या दोघांनाच खेळपट्टीवर तग धरता आला.

संक्षिप्त धावफलक:
दक्षिण आफ्रिका : 50 षटकांत 6 बाद 361

क्विंटन डिकॉक 22, रिली रॉसू 75, फाफ डू प्लेसिस 111, जेपी ड्युमिनी 82, डेव्हिड मिलर 26, फरहान बेहर्डिन 13, वेन पार्नेल नाबाद 8, अँडिली फेहलूक्वायो नाबाद 13
अवांतर : 11
गोलंदाजी :
ख्रिस ट्रेमेन 1-78, ज्यो मेनिन 0-82, जॉन हेस्टिंग्ज 3-57, मिशेल मार्श 2-68, ऍडम झम्पा 0-54, ट्रॅव्हिस हेड 0-21

ऑस्ट्रेलिया : 37.4 षटकांत सर्वबाद 219
ऍरॉन फिंच 1, डेव्हिड वॉर्नर 50, स्टीव्ह स्मिथ 14, जॉर्ज बेली 9, मिशेल मार्श 19, ट्रॅव्हिस हेड 51, मॅथ्यू वेड 33, जॉन हेस्टिंग्ज 23, ज्यो मेनिन 1, ऍडम झम्पा 8, ख्रिस ट्रेमेन नाबाद 0
अवांतर : 10
गोलंदाजी :
डेल स्टेन 1-37, कागिसो रबाडा 2-31, वेन पार्नेल 3-40, अँडिली फेहलूक्वायो 2-59, इम्रान ताहीर 1-31, जेपी ड्युमिनी 1-17

Web Title: South Africa beats Australia by 142 runs in Second ODI