कांगारुंची शिकार करत आफ्रिकेचा मालिका विजय

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

पावसामुळे दुसरा दिवस संपूर्ण वाया गेल्यानंतर सोमवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेने सामन्यावरची पकड कायम ठेवली होती. आज (मंगळवार) चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर स्थिरावू दिलेच नाही.

होबार्ट - बदली गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळालेल्या काईल ऍबॉटने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे कंबरडे मोडल्याने दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 80 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली.

पावसामुळे दुसरा दिवस संपूर्ण वाया गेल्यानंतर सोमवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेने सामन्यावरची पकड कायम ठेवली होती. आज (मंगळवार) चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर स्थिरावू दिलेच नाही. लंचपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा डाव 161 धावांत संपुष्टात आणला.  ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 121 अशी धावसंख्या केली होती. आज सकाळच्या सत्रात त्यांचे आठ फलंदाज अवघ्या 40 धावाच करू शकले. ऍबॉटने 77 धावा देत सहा बळी मिळविले. डेल स्टेनला दुखापत झाल्याने ऍबॉटला संघात स्थान देण्यात आले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामन्याचा मानकरीचा किताब देण्यात आला.

प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे आवश्‍यक आहे; परंतु त्यांना या सामन्यातही अपयश आले. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 241 धावांच्या भल्या मोठ्या पिछाडीवर राहिला होता. ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात अवघ्या 85 धावांत खुर्दा उडाला होता. दक्षिण आफ्रिकेने पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 177 धावांनी पराभव केला होता. तिसरा कसोटी सामना ऍडलेड येथे होणार दिवस-रात्र पद्धतीने खेळविला जाणार आहे. हा सामना जिंकूनही ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याच्या तयारीत दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे.
 
संक्षिप्त धावफलक - 
ऑस्ट्रेलिया, पहिला डाव - 85 आणि दुसरा डाव - सर्वबाद 161 (वॉर्नर 45  ऍबॉट 77-6) 
दक्षिण आफ्रिका, पहिला डाव ः 326 (हाशिम आमला 47, बवूमा 74, डिकॉक 104, फिलॅंडर 32, मिशेल स्टार्क 79-3, हेझलवूड 89-6)