विजयासह इंग्लंडची मालिकेत आघाडी

पीटीआय
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

लंडन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर जागे झालेल्या इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघावर २३९ धावांनी विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. विजयासाठी ४९२ धावांच्या अशक्‍यप्राय आव्हानासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव सोमवारी अखेरच्या पाचव्या दिवशी २५२ धावांत संपुष्टात आला. 

लंडन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर जागे झालेल्या इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघावर २३९ धावांनी विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. विजयासाठी ४९२ धावांच्या अशक्‍यप्राय आव्हानासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव सोमवारी अखेरच्या पाचव्या दिवशी २५२ धावांत संपुष्टात आला. 

अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाने ४ बाद ११७ धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरवात केली. तेम्बा बौउमा आणि डीन एल्गार यांचा पवित्रा बघता दिवस खेळून काढायचा हेच दक्षिण आफ्रिकेचे नियोजन दिसून येत होते. मात्र, याच बचावाने त्यांचा घात केला. पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या टॉबी रोलॅंडने ५०व्या षटकांत लागोपाठच्या चेंडूवर बौउमा आणि फिलॅंडर यांना पायचीत पकडले. डीन एल्गरने प्रथम बौउमा आणि नंतर ख्रिस मॉरिस, केशव महाराज यांना साथीला घेत पराभव लांबविण्याचा प्रयत्न केला. एल्गरची खेळी झुंजार होती; पण त्याला समोरून तेवढी मोलाची साथ मिळू शकली नाही.

दुसऱ्या डावांत मोईन अलीची फिरकी त्यांना जड गेली. चिकटून राहणारी जोडी रोलॅंडने फोडल्यावर मोईन अलीने हॅट्‌ट्रिक साजरी करत इंग्लंडच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. 

एल्गरने झुंजार शतक झळकावताना २२८ चेंडूंत २० चौकारांसह १३६ धावा केल्या. मोईनने ४५ धावांत ४, तर रोलॅंडने ७२ धावांत ३ गडी बाद केले. 

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड ३५३ आणि ८ बाद ३१३ (घोषित) वि. वि. दक्षिण आफ्रिका १७५ आणि २५२ (डीन एल्गर १३६ २२८ चेंडू, २० चौकार, तेम्बा बौउमा ३२, ख्रिस मॉरिस २४, केशव महाराज २४, टॉबी रोएलॅंड ३-७२, बेन स्टोक्‍स २-५१, मोईन अली ४-४५)

शंभराव्या कसोटीत हॅट्‌ट्रिक
इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अली याने हॅट्‌ट्रिक साजरी करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ओव्हलवर खेळला गेलेला हा शंभरावा सामना होता. शंभर सामन्याच्या इतिहासात मैदानावर नोंदली गेलेली ही पहिलीच हॅट्‌ट्रिक ठरली. हॅट्‌ट्रिकही विलक्षण ठरली. ७६व्या षटकांत मोईनने एल्गर आणि रबाडा यांना स्लिपमध्ये स्टोक्‍सकरवी झेलबाद केले आणि त्यानंतर ७८व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मॉर्केल पायचीत असल्याचा कौल रेफरल घेऊन मिळविला. इंग्लंड क्रिकेटच्या ७९ वर्षांच्या इतिहासात हॅट्‌ट्रिक मिळविणारा मोईन पहिला फिरकी गोलंदाज ठरला.