‘बीसीसीआय’च्या विरोधाचा ‘नाडा’ला बसणार फटका?

पीटीआय
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली - खेळाडूंच्या उत्तेजक चाचणीला बीसीसीआय करत असलेला विरोध असाच कायम राहिला, तर राष्ट्रीय उत्तेजक चाचणी एजन्सीला (नाडाला) आंतरराष्ट्रीय उत्तेजक चाचणी एजन्सीतील (वाडा) सदस्यत्व गमवावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - खेळाडूंच्या उत्तेजक चाचणीला बीसीसीआय करत असलेला विरोध असाच कायम राहिला, तर राष्ट्रीय उत्तेजक चाचणी एजन्सीला (नाडाला) आंतरराष्ट्रीय उत्तेजक चाचणी एजन्सीतील (वाडा) सदस्यत्व गमवावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

वाडाने जगात क्रिकेटचे पालकत्व असलेल्या आयसीसीला सूचना देऊन बीसीसीआयवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि वाडामार्फत भारतीय खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेण्यास सांगितले आहे. तसे झाले नाही आणि बीसीसीआयने विरोध कायम ठेवला, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले प्रतिनिधित्व नाडाला गमवावे लागेल. वाडाचे सरसंचालक ओलिव्हर निग्ली यांनी भारताचे क्रीडामंत्री राजवेंदर राठोड यांना पत्र लिहून हा मुद्दा विस्तृत केला आहे.

तुन्ही (क्रीडा मंत्रालय) लवकरात लवकर या प्रकरणातू मार्ग काढावा आणि भारतीय क्रिकेट मंडळाला आपल्या खेळाडूंच्या उत्तेजक चाचणीसाठी सहाकार्य करावे आणि जर असे घडले नाही आणि नाडाने वाडाशी असलेले सदस्यत्व गमावले, तर भारतात होणारी कोणतीही उत्तेजक चाचणी अधिकृत राहणार नाही आणि त्याच्या जागतिक स्तरावरील क्रीडा क्षेत्रात नकारात्मक संदेश जाईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आम्ही आयसीसीकडेही हा विषय मांडला असून त्यांच्यामार्फत बीसीसीआयला अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ओलिव्हर निग्ली पत्रात म्हणतात.

राठोड यांचे सावध पाऊल
निग्ली यांचे हे पत्र मिळाल्यानंतर क्रीडामंत्री आणि माजी ऑलिंपिक पदकविजेते राठोड यांनी सावध पाऊल उचलले आहे. क्रीडा सचिव इंजित श्रीनिवास यांनी हा मुद्दा बीसीसीआय अधिकाऱ्यांकडे मांडावा आणि त्यांना याची माहिती द्यावी अशा सूचना दिल्या आहे. इंजित श्रीनिवास यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांना पत्र लिहून वाडाची मागणी पूर्ण करण्यास सांगितले आहे.

‘वाडा’ क्रिकेटबाबत गंभीर
दरम्यान, नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांनी भारतीय क्रिकेटपटूंच्या उत्तेजक चाचणीबाबत वाडा फारच गंभीर असल्याचे सांगितले. आता तर त्यांनी हा मुद्दा क्रीडा मंत्रालयापर्यंत नेला आहे.