इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल

पीटीआय
बुधवार, 7 जून 2017

कार्डिफ - फलंदाजी आणि गोलंदाजीच्या आघाडीवर सरस कामगिरीचे प्रदर्शन करत इंग्लंडने यंदाच्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मान मिळविला. यजमान इंग्लंडने सोमवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा ८७ धावांनी पराभव केला. ‘अ’ गटातून आता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस असेल. 

कार्डिफ - फलंदाजी आणि गोलंदाजीच्या आघाडीवर सरस कामगिरीचे प्रदर्शन करत इंग्लंडने यंदाच्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मान मिळविला. यजमान इंग्लंडने सोमवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा ८७ धावांनी पराभव केला. ‘अ’ गटातून आता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस असेल. 

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३१० धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडचा डाव २२३ धावांत आटोपला. इंग्लंडने उभ्या केलेल्या मोठ्या आव्हानासमोर न्यूझीलंडचे आव्हान कर्णधार विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी ९५ धावांची भागीदारी करून कायम ठेवले होते. विल्यम्सन ८७ धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतरही रॉस टेलर टिकून राहिल्याने आशा होती. परंतु टेलर बाद झाल्यावर न्यूझीलंडचा डाव घसरत गेला. वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेटने ५५ धावांत ४ गडी बाद करून इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. न्यूझीलंडला पहिला दणका देणारा जेक बॉल सामन्याचा मानकरी ठरला. 

त्यापूर्वी, सकाळी ढगाळ वातावरण असल्यामुळे न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. ठराविक अंतराने इंग्लंडचे फलंदाज त्यांनी बाद केले. त्यामुळे ४९.३ षटकांत त्यांचा डाव गुंडाळला. मात्र, त्यांना इंग्लंडला तीनशे धावांपर्यंत मजल मारण्यापासून रोखता आले नाही. गेल्या १३ सामन्यांपैकी ११ सामन्यांत इंग्लंडने तीनशे धावा केल्या आहेत. 

जेसन रॉयला बाद करून न्यूझीलंडने चांगली सुरवात केली होती; परंतु ॲलेक्‍स हेल्स आणि ज्यो रूट यांनी संघाला शंभरी पार करून दिली. या दोघांनीही अर्धशतके केली. इंग्लंड कर्णधार मॉर्गन आक्रमक सुरवात करून लवकर बाद झाला. त्यानंतर बेन स्टोक्‍स्‌ने फलंदाजीतली आपली आक्रमकता दाखवली. अखेरची दहा षटके शिल्लक असताना इंग्लंडला ६ बाद २३० असे रोखण्यात न्यूझीलंडला यश आले होते; परंतु बटलरने ४८ चेंडूंत नाबाद ६१ धावा करून इंग्लंडचे आव्हान भक्कम केले. 

संक्षिप्त धावफलक 
इंग्लंड ४९.३ षटकांत सर्वबाद ३१० (ॲलेक्‍स हेल्स ५६- ६२ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, ज्यो रूट ६४ -६५ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, बेन स्टोक्‍स ४८ -५३ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, ज्योस बटलर नाबाद ६१ -४८ चेंडू, २ चौकार, २ षटकार, टीम साऊदी २-४४, मिल्ने ३-७९, अँडरसन ३-५५) वि.वि. न्यूझीलंड ः४४.३ षटकांत सर्वबाद २२३ (मार्टिन गुप्तील २७, केन विलिमसन ८७, रॉस टेलर ३९, बॉल २-३१, प्लंकेट ४-५५, रशिद २-४७)