इतिहास बदलण्याची भारताला संधी

पीटीआय
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली - कसोटी असो वा एकदिवसीय, एरवी न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवणाऱ्या भारताला त्यांच्याविरुद्ध कधीच टी-२० सामना जिंकता आलेला नाही. उद्यापासून (ता. १) सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतून हा इतिहास बदलण्याची संधी भारताला मिळणार आहे.

नवी दिल्ली - कसोटी असो वा एकदिवसीय, एरवी न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवणाऱ्या भारताला त्यांच्याविरुद्ध कधीच टी-२० सामना जिंकता आलेला नाही. उद्यापासून (ता. १) सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतून हा इतिहास बदलण्याची संधी भारताला मिळणार आहे.

प्रामुख्याने मायदेशात विविध प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध गेल्या काही महिन्यांत मिळवलेल्या यशामुळे भारताला अधिक पसंती दिली जात आहे; पण सध्या टी-२०च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला न्यूझीलंडचा संघही कसलेला आहे. नुकतीच संपलेली एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशी जिंकली असली तरी न्यूझीलंडने निर्णायक सामन्यात अखेरपर्यंत लढवले होते हे विसरून चालणार नाही.

न्यूझीलंडकडे कोणी सुपरस्टार खेळाडू नसला तरी मॅचविनर ठरण्याची प्रत्येक खेळाडूकडे क्षमता आहे. आता भारतातील तीन एकदिवसीय सामन्यांतून त्यांची फलंदाजी खोलवर असल्याचे दिसून आले आहे. कर्णधार केन विल्यम्सन, मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, हेन्री निकोलस या सर्वांकडे टोलेबाजी करण्याची क्षमता आहे. त्यांच्या साथीला टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट असे अनुभवी गोलंदाज आहेत. 

इतिहास काहीही असला तरी भारतीय संघ वर्चस्व मिळवण्याच्या मानसिकतेनेच मैदानात उतरेल. या मालिकेसाठी पहिल्यांदा संधी मिळालेले श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज संधी मिळाली तर सर्वस्व झोकून देतील. दिनेश कर्तिक आणि हार्दिक पंड्या हे मधल्या फळीतील फलंदाजही भारतासाठी मौल्यवान आहेत. 

शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीत बदल होण्याची शक्‍यता नाही. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. महेंद्रसिंह धोनीसाठीही ही मालिका महत्त्वाची आहे. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमरा-भुवनेश्‍वर कुमार यांच्यावर मदार असेल. आशीष नेहराचा हा अखेरचा सामना असेल. घरच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यातून त्याने निवृत्ती जाहीर केलेली असल्यामुळे उद्याच्या सामन्यात त्याला खेळवले जाईल.