भारत वि. न्युझीलंड : पिच क्युरेटर साळगावकरांचे निलंबन

बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

साळगावकर यांचे एमसीएचे सभासदत्व आणि सर्व काम रद्द करण्यात आले आहे.

पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात नेमके काय घडले आहे याबाबत एमसीए सविस्तर चौकशी करेल. दरम्यान, आमची तातडीची बैठक होण्यापूर्वी मी एमसीएचा अध्यक्ष या नात्याने पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचे त्वरीत निलंबन केले आहे, असे 'एमसीए'चे अध्यक्ष अभय आपटे यांनी सांगितले.

"फिक्सिंगचा हा विषय विचलित करणारा आहे. फिक्सिंगबाबत महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून अजिबात दया दाखविली जात नाही. त्याबाबत येथे 'झिरो टॉलरन्स' आहे. तसेच, साळगावकर यांचे एमसीएचे सभासदत्व आणि सर्व काम रद्द करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निरीक्षकांनी खेळपट्टीला मंजुरी दिली आहे. सामना वेळेतच सुरू होत आहे," असे पत्रकारांशी बोलताना आपटे यांनी स्पष्ट केले. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्यात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हा सामना होत असल्याचे हे निश्चित असले तरी साळगावकर यांच्यावर फिक्सिंगचा आरोप झाल्याने त्यांच्यावर कारवाई होणार की नाही याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, साळगावकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याच्या वृत्ताला आपटे यांनी दुजोरा दिला.

आजचा सामना सुरू होण्यास काही तास शिल्लक असताना एका वृत्तवाहिनीने क्युरेटर साळगावकर बुकींकडून पैसे घेऊन खेळपट्टी हवी तशी बनविण्यास तयार असल्याचा आरोप केला. त्यामुळे या सामन्याला वेगळीच कलाटणी मिळाली. न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत पहिला सामना गमाविल्याने भारतीय संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. 

या प्रकऱणाची दखल घेऊन आयसीसीचे सामनाधिकारी पीच पाहून निर्णय घेतला, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र क्रिकेट मंडळाकडून (एमसीए) अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.