कसोटी खेळण्यासाठी कुलदीप उत्सुक

गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

लहानपणापासून भारत अरुण यांच्याकडूनच मार्गदर्शन घेतले आहे. गोलंदाजीतील अनेक बारकावे त्यांनीच मला शिकवले आहेत. आता ते भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक असल्यामुळे मला त्यांचा खूप फायदा होतो. गोलंदाजीला सुरवात करताना प्रचंड दडपण असते. पण, पहिला चेंडू आणि काही षटके टप्प्यावर पडली की ते दूर होते.
-कुलदीप यादव

कॅंडी - ऑस्ट्रेलियाविरुद्ध यशस्वी कसोटी पदार्पण केल्यानंतरही ‘चायनामन’ कुलदीप यादवला कसोटी सामना खेळण्यासाठी वाट बघावी लागत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर रवींद्र जडेजाला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या जागी कुलदीपला संधी मिळणार अशीच चर्चा आहे. कुलदीपही कसोटी क्रिकेट खेळण्यास कमालीचा उत्सुक आहे. तो संधीची वाट बघत आहे. 

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर कुलदीपशी चर्चा करण्याची संधी मिळाली. तेव्हा कुलदीप म्हणाला, ‘‘जेव्हा कसोटी क्रमवारीतील पहिल्या दोन क्रमांकाचे गोलंदाज ज्या संघात खेळत असतात, तेव्हा तिसऱ्या फिरकी गोलंदाजाला संधी मिळण्यासाठी वाटच पाहावी लागले. दुर्दैवाने जडेजाला शिक्षा झाल्याने माझी खेळण्याची संधी वाढली आहे. माझी तयारी चांगली आहे. सरावदेखील खूप केला आहे. मी या सामन्यात खेळण्यासाठी कमालीचा उत्सुक आहे.’’

श्रीलंकेतील खेळपट्ट्यांबाबत कुलदीप म्हणाला, ‘‘मुळात खेळायचे नक्की असते. त्यामुळे मी कधीच विकेट बघत नाही. फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नाही, अशा सिमेंटच्या विकेटवर खेळण्यात माझे बालपण गेले आहे. अशा विकेट्‌सवर सराव करून मी खंबीर झालो आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या काय कुठल्याच विकेट्‌सची भीती वाटत नाही. कॅंडीच्या विकेटवर गवत असेल, तर चेंडूला उसळी मिळेल. फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी योग्य टप्पा आणि दिशा असणे आवश्‍यक असते.’’

दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असून देखील कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पंड्याला खेळवण्याचा हट्ट पूर्ण केला. तिसऱ्या कसोटीत जडेजा खेळणार नसल्याने कोहलीसमोर कुलदीपला खेळविण्याशिवाय पर्याय उरणार नाही. मात्र, ‘बीसीसीआय’ने जडेजाच्या जागी अक्षर पटेलला टाकून वेगळीच चाल खेळली आहे. त्यामुळे आता अंतिम अकरात कुणाला संधी मिळणार हे बघावे लागेल.