आयपीएल: 2199 कोटी मोजून 'विवो' झाले मुख्य प्रायोजक

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

या निविदांमध्ये 'विवो'ने बाजी मारली. त्यांनी गेल्या करारापेक्षा तब्बल 554 टक्के जास्त रकमेची बोली लावली होती. नव्या करारानुसार, 2018 ते 2022 या कालावधीसाठी 'विवो' हेच 'आयपीएल'चे मुख्य प्रायोजक असतील. 

नवी दिल्ली : ट्‌वेंटी-20 क्रिकेटमधील समीकरणेच बदलून टाकणाऱ्या 'इंडियन प्रीमिअर लीग'चे (आयपीएल) मुख्य प्रायोजक म्हणून 'विवो' या चिनी मोबाईल कंपनीचा करार कायम ठेवण्यात आला आहे. 'आयपीएल'च्या पुढील पाच वर्षांसाठी 'विवो'ने 2199 कोटी रुपयांची बोली लावली होती. गेल्या महिन्यात संपलेल्या 'आयपीएल'चे मुख्य प्रायोजक 'विवो'च होते. 

यापूर्वी 2016 आणि 2017 या वर्षांसाठी 'विवो'ने 200 कोटी रुपयांची बोली लावत प्रायोजकत्व पटकाविले होते. 2014-15 पासून 'विवो' हे 'आयपीएल'चे मुख्य प्रायोजक होते. 'आयपीएल'च्या पहिल्या पाच वर्षांसाठी 'पेप्सी' हे मुख्य प्रायोजक होते. 'आयपीएल'चा दहा वर्षांचा पहिला टप्पा संपल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रायोजकासाठी निविदा मागविल्या होत्या. यासाठी आज (27 जून) दुपारी 12 पर्यंतची मुदत होती. 

या निविदांमध्ये 'विवो'ने बाजी मारली. त्यांनी गेल्या करारापेक्षा तब्बल 554 टक्के जास्त रकमेची बोली लावली होती. नव्या करारानुसार, 2018 ते 2022 या कालावधीसाठी 'विवो' हेच 'आयपीएल'चे मुख्य प्रायोजक असतील. 

2018 हे 'आयपीएल'चे 11 वे वर्ष असेल. 2008 मध्ये पहिल्या पर्वाआधी सर्व खेळाडूंचा लिलाव झाला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी संघ मालकांना काही खेळाडू राखून ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. हे सर्व करार 10 वर्षांसाठी असल्याने आता 'पुढील वर्षी सर्व खेळाडू पुन्हा लिलावासाठी उपलब्ध असणार का' आणि 'गुजरात लायन्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स या संघांचे काय होणार' हे प्रश्‍न अनुत्तरित आहेत. 'स्पॉट फिक्‍सिंग'मुळे दोन वर्षांची बंदी लादलेले चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघदेखील आता पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे 2018 च्या 'आयपीएल'मध्ये नेमके किती संघ असतील, याविषयी अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.