भारताचा प्रशिक्षक कोण? थांबा, कोहलीशी चर्चा व्हायची आहे..! 

टीम ई सकाळ
सोमवार, 10 जुलै 2017

माजी कर्णधार सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर या तिघांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. गांगुली आणि लक्ष्मण हे मुंबईतील 'बीसीसीआय'च्या कार्यालयात उपस्थित होते, तर सचिन तेंडुलकर यांनी ब्रिटनमधून 'स्काईप'द्वारे उपस्थिती लावली.

मुंबई : 'भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण' या प्रश्‍नाचे उत्तर मिळविण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) प्रशिक्षकपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या आज (सोमवार) मुलाखती घेतल्या. भारताचा कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतर प्रशिक्षकाबाबत निर्णय घेतला जाईल, असे या मुलाखती संपल्यानंतर सांगण्यात आले. 

माजी कर्णधार सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर या तिघांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. गांगुली आणि लक्ष्मण हे मुंबईतील 'बीसीसीआय'च्या कार्यालयात उपस्थित होते, तर सचिन तेंडुलकर यांनी ब्रिटनमधून 'स्काईप'द्वारे उपस्थिती लावली. 'प्रशिक्षकांची घोषणा आज रात्रीपर्यंत होईल' अशी माहिती गांगुली यांनी 'टाईम्स नाऊ'शी बोलताना दिली. 

अनिल कुंबळे यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर या पदासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले. यात रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मूडी यांच्यात चुरस होती. गेल्या वर्षी प्रशिक्षकपदासाठीच झालेल्या मुलाखतीदरम्यान शास्त्री आणि गांगुली यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे यावेळी अर्ज न करण्याची भूमिका शास्त्री यांनी घेतली होती. सचिन तेंडुलकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर शास्त्री यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. 

या पदासाठी आज (मंगळवार) शास्त्री, सेहवाग, मूडी यांच्यासह फिल सिमन्स, रिचर्ड पायबस आणि लालचंद राजपूत यांच्या मुलाखती होणे अपेक्षित होते.