दुसऱ्याच दिवशी भारताचे वर्चस्व; श्रीलंका 5 बाद 154 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

धावफलक : 
भारत : पहिला डाव : सर्वबाद 600 
शिखर धवन 190, अभिनव मुकुंद 12, चेतेश्‍वर पुजारा 153, विराट कोहली 3, अजिंक्‍य रहाणे 57, आर. आश्‍विन 47, वृद्धिमान साहा 16, हार्दिक पांड्या 50, रवींद्र जडेजा 15, महंमद शमी 30, उमेश यादव नाबाद 11 
गोलंदाजी : नुवान प्रदीप 6-132, लाहिरु कुमार 3-131, दिलरुवान परेरा 0-130, रंगना हेराथ 1-159, दानुष्का गुणतलिका 0-41 
श्रीलंका : पहिला डाव : 44 षटकांत 5 बाद 154 (दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा) 
उपुल थरंगा 64, अँजेलो मॅथ्यूज खेळत आहे 54 
गोलंदाजी : महंमद शमी 2-30, उमेश यादव 1-50, आर. आश्‍विन 1-49, रवींद्र जडेजा 0-22

गॉल : भारतीय फलंदाजांनी रचलेल्या धावांच्या डोंगराचे दडपण घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या अननुभवी संघाला भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आक्रमणाला तोंड द्यावे लागले. यामुळे पहिल्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला, तेव्हा भारताच्या पहिल्या डावातील 600 धावांसमोर श्रीलंकेची अवस्था 5 बाद 154 अशी झाली. पहिल्या डावातील फॉलो-ऑन वाचविण्यासाठी श्रीलंकेला आणखी 247 धावांची गरज आहे. 

फलंदाजांच्या 600 धावांच्या पाठबळामुळे उमेश यादव आणि महंमद शमी यांच्या वेगवान गोलंदाजीला आणखी धार आली. या दोघांनी श्रीलंकेची आघाडीची फळी उध्वस्त केली. त्यानंतर आर. आश्‍विननेही फलंदाजांना सतावले. आश्‍विनच्या गोलंदाजीवर उपुल थरंगा पुढे सरसावून फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. चेंडू त्याच्या पॅडला लागून सिली पॉईंटवर उभ्या असलेल्या अभिनव मुकुंदच्या हातात गेला. मुकुंदने चपळाईने चेंडू यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या दिशेने फेकला आणि साहाने बेल्स उडविल्या. त्यानंतर अभिनव मुकुंदने उजव्या बाजूला झेपावत निरोशन डिकवेलाचा अफलातून झेल पकडला. अर्धशतक झळकाविलेला अँजेलो मॅथ्यूज एका बाजूने श्रीलंकेसाठी किल्ला लढवित आहे. त्याच्या साथीला आता अष्टपैलू दिलरुवान परेरा आहे. 

तत्पूर्वी, शिखर धवन (190) आणि चेतेश्‍वर पुजारा (153) यांच्या दमदार शतकांनंतर अजिंक्‍य रहाणे (57), आर. आश्‍विन (47), हार्दिक पांड्या (50) आणि महंमद शमी (30) यांनीही फटकेबाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमछाक केली.