शिखर धवनचे अर्धशतक; भारताची भक्कम सुरवात 

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जुलै 2017

संक्षिप्त धावफलक : 
भारत : (पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत) 27 षटकांत 1 बाद 115 
अभिनव मुकुंद 12, शिखर धवन खेळत आहे 64, चेतेश्‍वर पुजारा खेळत आहे 37

गॉल : नव्या प्रशिक्षकांसह पहिली कसोटी खेळणाऱ्या भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध आज (बुधवार) नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ठसा उमटविलेल्या हार्दिक पांड्याला कसोटीमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. नियमित सलामीवीरांना झालेल्या दुखापतींमुळे संघात स्थान मिळालेल्या अभिनव मुकुंदला या संधीचा फायदा घेता आला नाही. पहिल्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला, तेव्हा भारताने 27 षटकांत एक गडी गमावून 115 धावा केल्या होत्या. सलामीवीर शिखर धवन 64, तर चेतेश्‍वर पुजारा 37 धावांवर खेळत आहेत. 

गॉलची खेळपट्टी टणक असून त्यावर गवतही आहे. त्यामुळे यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार विराट कोहलीने घेतला. पूर्ण तंदुरुस्त झालेल्या रोहित शर्माऐवजी पांड्याला संधी देत कोहलीने गोलंदाजीची बाजूही भक्कम करण्याचा निर्णय घेतला. उमेश यादव आणि महंमद शमी या वेगवान गोलंदाजांसह आर. आश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान मिळाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादवला संघाबाहेर बसावे लागले. 

दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाला दुखापतींनी हैराण केले आहे. नियमित कर्णधार दिनेश चंडिमल दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याऐवजी अनुभवी फिरकी गोलंदाज रंगना हेराथकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.