क्रिकेट: चार महिन्यांत भारतीय संघ खेळणार 23 सामने 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

यंदा सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत भारतीय संघ तीन कसोटी, 11 एकदिवसीय आणि 9 ट्‌वेंटी-20 सामने खेळणार आहे. या कालावधीत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. 

मुंबई : गेल्या मोसमात मायदेशात 13 कसोटी खेळणाऱ्या भारतीय संघाला यंदाच्या मोसमात आणखी धावपळीच्या वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे. यंदा सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत भारतीय संघ मायदेशात तब्बल 23 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. 

या नियोजनामुळे भारतीय संघाचे वेळापत्रक भरगच्च असणार आहे. यंदाच्या मोसमात भारतातील आणखी दोन मैदानांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. यात केरळमधील 'ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम' आणि आसाममधील 'डॉ. भूपेन हजारिका क्रिकेट स्टेडियम' यांचा समावेश आहे. 

यंदा सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत भारतीय संघ तीन कसोटी, 11 एकदिवसीय आणि 9 ट्‌वेंटी-20 सामने खेळणार आहे. या कालावधीत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. 

'बीसीसीआय'च्या नियोजनानुसार, सप्टेंबर ते ऑक्‍टोबरच्या मध्यापर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. यात पाच एकदिवसीय आणि तीन ट्‌वेंटी-20 होतील. यानंतर लगेचच न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होईल. यात तीन एकदिवसीय आणि तीन ट्‌वेंटी-20 लढती होतील. न्यूझीलंडविरुद्धची मालिका नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपेल. त्यानंतर श्रीलंका भारत दौऱ्यावर येईल. यामध्ये तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन ट्‌वेंटी-20 सामने होतील. डिसेंबरमध्ये ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.