महिला क्रिकेटमध्ये आज भारत-पाक लढत

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

भारताने आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानचा पराभव झाला आहे. ही सुद्धा भारताच्या जमेची बाजू असेल. भारताच्या फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. सलामीला स्मृती मानधना हिने जोरदार कामगिरी केली आहे. याशिवाय पूनम राऊत, मिताली राज, हर्मनप्रीत कौर यांनीही चांगले योगदान दिले आहे.

डर्बी (इंग्लंड) : विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत होत आहे. यजमान इंग्लंड आणि टी-20 जगज्जेत्या वेस्ट इंडीज यांच्यावरील विजयासह भारताने स्पर्धेला धडाकेबाज प्रारंभ केला आहे. त्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघासमोर विजयाच्या हॅट्ट्रिकसह प्रतिष्ठा राखण्याचे लक्ष्य असेल. 

कागदावर भारताचे पारडे जड असेल. अर्थात प्रत्यक्ष मैदानावर तशी कामगिरी करून दाखवावी लागेल. 

एकतर्फी वर्चस्व 
पाकिस्तानविरुद्धचा एकतर्फी विजयाचा इतिहास भारताच्या जमेची बाजू असेल. भारताने नऊ सामन्यांत सात विकेट, सहा विकेट, दहा विकेट, 207 धावा, 182 धावा, 103 धावा, 80 धावा, दहा विकेट आणि 193 धावा अशा मोठ्या फरकांचे विजय नोंदविले आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने वन-डे पदार्पण केल्यानंतर 19 वर्षांनी 1997 मध्ये पाकला संधी मिळाली. पाकच्या पदार्पणापूर्वी भारताने तीन विश्‍वकरंडक स्पर्धांत भाग घेतला होता. जास्त काळ खेळल्याचा अनुभव असल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानच्या तुलनेत जास्त प्रगती केली आहे. एकतर्फी वर्चस्वाचे हे मुख्य कारण आहे. पाकची ही तिसरी, तर भारताची आठवी विश्‍वकरंडक स्पर्धा आहे. 1993 मधील पहिल्या स्पर्धेपासून भारताने 2013च्या मायदेशातील स्पर्धेचा अपवाद सोडल्यास दरवेळी उपांत्य फेरी गाठली आहे. 2005 मध्ये भारताने उपविजेतेपद मिळविले होते. दुसरीकडे 2009च्या स्पर्धेतील सहावा क्रमांक ही पाकची सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय दोन वेळा पाकला या स्पर्धेस पात्र ठरण्यातही अपयश आले होते. 

भारताने आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानचा पराभव झाला आहे. ही सुद्धा भारताच्या जमेची बाजू असेल. भारताच्या फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. सलामीला स्मृती मानधना हिने जोरदार कामगिरी केली आहे. याशिवाय पूनम राऊत, मिताली राज, हर्मनप्रीत कौर यांनीही चांगले योगदान दिले आहे. चपळ क्षेत्ररक्षण हे सुद्धा भारतीय संघाचे वैशिष्ट्य आहे. 

दृष्टिक्षेपात 

  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात नऊ सामने 
  • सर्व नऊ सामन्यांत भारताची सरशी 
  • विश्‍वकरंडक स्पर्धेत दोन वेळा आमनेसामने 
  • दोन्ही वेळा भारताचे दणदणीत विजय 
  • 2009 आणि 2013 या स्पर्धांनंतर तिसरी लढत