महिला विश्‍वकरंडक: दणदणीत विजयासह भारत उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

डर्बी : कर्णधार मिताली राजचे शानदार शतक, वेदा कृष्णमूर्तीची आक्रमक फलंदाजी आणि त्यानंतर स्पर्धेतला पहिलाच सामना खेळणाऱ्या राजेश्‍वरी गायकवाडने टिपलेले पाच बळी, यामुळे भारताने न्यूझीलंडचा 186 धावांनी धुव्वा उडवला आणि महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. 

पहिल्या चार सामन्यांत विजय आणि त्यानंतर दोन पराभव, यामुळे भारताच्या वाटचालीला ब्रेक लागला होता. उपांत्य फेरीसाठी आजचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकणे अनिवार्य होते, मिताली राजच्या संघाने न्यूझीलंडला प्रतिकाराचीही संधी दिली नाही. 2010 नंतर कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भारताने प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे.

तीन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूनम राऊतने शतक केले होते. तिला मिताली राजने चांगली साथ दिली होती, तरीही भारताला पुरेशी धावसंख्या रचता आली नव्हती. आजचा सामना 'आर या पार' असा असल्यामुळे सलामीची जोडी झटपट बाद झाल्यावरही भारतीयांनी किमान अडीचशे धावांचे लक्ष्य ठरवले होते. ते साध्यही झाले. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम करणाऱ्या मितालीने आपली हुकमत सिद्ध केली. तिने 11 चौकारांसह 109 धावांची खेळी केली. हर्मनप्रीत कौरने 90 चेंडूत 60 धावा केल्या; परंतु भारतीयांची धावांची गाडी जोरात पळवली ती वेदा कृष्णमूर्तीने. तिने 45 चेंडूंतच 70 धावांचा तडाखा दिला. 

ढगाळ वातावरणामुळे न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजी दिली. पूनम आज चार धावांवर परतली, स्मृती मानधना (13) पुन्हा एकदा अपयशी ठरली. त्यामुळे भारताची 2 बाद 21 अशी अवस्था झाली. मितालीने आज डाव सावरण्याबरोबर आक्रमक पवित्राही घेतला. भारताच्या खात्यात 60 धाव जमा झाल्यानंतर पावसाचा काही काळ व्यत्यय आला होता; परंतु मिताली आणि हर्मनप्रीत कौर यांनी आपल्या पवित्र्यात खंड पडू दिला नाही. या दोघींनी शतकी भागीदारी केली. 

हर्मनप्रीतनंतर दीप्ती शर्मा लगेचच बाद झाली. त्यामुळे भारताची 2 बाद 153 वरून 4 बाद 154 अशी घसरगुंडी उडाली; मात्र याचे दडपण मिताली आणि वेदा यांनी घेतले तर नाहीच; उलट प्रतिहल्ला केला. या दोघांनी 78 चेंडूत 108 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला अडीचशेचा टप्पा पार करता आला.

मिताली राज (109), हमनप्रीत कौर (60) आणि वेदा कृष्णमूर्ती (45 चेंडूंत 70) यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 265 धावा उभारल्या. त्यानंतर न्यूझीलंडला अवघ्या 79 धावांत गुंडाळले. डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्‍वरीने 15 धावांत 5 विकेट मिळवल्या, तर दीप्ती शर्माने दोन विकेटचे योगदान दिले. इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट मिळवले.

संक्षिप्त धावफलक 
भारत : 50 षटकांत 7 बाद 265 (मिताली राज 109 -123 चेंडू, 11 चौकार, हर्मनप्रीत कौर 60-90 चेंडू, 7 चौकार, वेदा कृष्णमूर्ती 70-45 चेंडू, 7 चौकार, 2 षटकार, लिघ कास्प्रेक 3-45, हॅना रो 2-30) 

न्यूझीलंड : 25.3 षटकांत सर्वबाद 79 (सॅटरवेट 26, दीप्ती शर्मा 2-26, राजेश्‍वरी गायकवाड 5-15).