कुंबळे-कोहलीमध्ये मतभेद आहेत...मनभेद नाहीत!

शुक्रवार, 2 जून 2017

चॅंपियन्स स्पर्धेसाठी भारतीय संघाकडे केवळ गतविजेते म्हणून नाही, तर एक तुल्यबळ संघ म्हणून बघितले जात आहे. संघातील खेळाडू हे अनुभवी आणि समजदार आहेत. त्यामुळे खेळाडू मैदानावर आपली कामगिरी चोख पार पाडतील, असेच बीसीसीआयचे पदाधिकारी खासगीत बोलत आहेत.

बर्मिंगहॅम : भारतीय संघ चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या पहिल्याच पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी तयारी करण्यात गुंग असतानाच मैदानाबाहेर प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील वादाची चर्चा चांगलीच रंगली आहे. भारतीय खेळाडूंच्या देहबोलीचे वेगवेगळे अर्थ काढून वाहिन्याचे प्रतिनिधी आपले वार्तांकन करत आहेत. प्रत्यक्षात दोघांशी झालेल्या अल्पशा चर्चेतून दोघांमध्ये मतभेद आहेत; पण मनभेद नाहीत याबाबत खात्री पटली. 

भारतीय संघाने दोन तास कसून सराव केला. हा सराव सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी मैदानावर आले.

ते म्हणाले, ''कुंबळे-कोहली यांच्यात वाद असल्याच्या बातम्या म्हणजे केवळ थोतांड आहे. माझ्या कानावर तरी याबाबत अजून काही आलेले नाही.'' अर्थात सरावादरम्यान कोहली आणि कुंबळे फारच कमी वेळेला एकमेकांशी चर्चा करताना दिसून आले.

सराव संपून मैदान सोडताना दोघेही भेटले. ही भेट ओझरतीच होती. पण, त्यांनी मतभेद असले, तरी मनभेद नसल्याचे सांगितले. 