हसरंगाची हॅटट्रिक

पीटीआय
सोमवार, 3 जुलै 2017

संक्षिप्त धावफलक
झिंबाब्वे ३३.४ षटकांत सर्वबाद १५५ (हॅमिल्टन मसाकदझा ४१, माल्कम वॉलर ३८, लक्षण संदाकन ४-५२, वानिदु हसरंगा ३-१५) पराभूत वि. श्रीलंका ३०.१ षटकांत ३ बाद १५८ (थरंगा नाबाद ७५, डिकवेला ३५, चतारा २-३३)

गॉल - पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात झिंबाब्वेने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळविला. पण, रविवारी दुसऱ्या सामन्यात त्यांना तेवढ्याच दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेने पहिल्या पराभवाची सव्याज परतफेड करत दुसरा सामना सात गडी राखून जिंकला. वानिदु हसरंगाने पदार्पणातच मिळविलेली हॅटट्रिक त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. 

श्रीलंकेने झिंबाब्वेला १५५ धावांत गुंडाळल्यावर ३०.१ षटकांतच ३ बाद १५८ धावा करून विजय मिळविला. उपूल थरंगाने नाबाद ७५ धावांचे योगदान दिले. लक्षन संदाकन याने चार गडी बाद केले.  प्रथम फलंदाजी करताना हॅमिल्टन मसाकद्‌झाच्या संयमी ४१ आणि माल्कम वॉलरच्या ३८ धावा वगळता झिंबाब्वेचे फलंदाज श्रीलंकेच्या फिरकीसमोर टिकू शकले नाहीत. हसरंगाने त्यांच्या डावाला पूर्णविराम देताना हॅटट्रिक घेतली. केवळ सोळा चेंडू टाकणाऱ्या हसरंगाने प्रथम स्थिरावलेल्या वॉलरला बाद केले. त्यानंतर तिरीपानो आणि चतारा यांना बाद केले.

आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने देखील दोन फलंदाज १० धावांत गमावले. त्यानंतर निरोशान डिकवेला आणि उपूल थरंगा यांनी श्रीलंकेचा विजय निश्‍चित केला. डिकवेला बाद झाल्यावर थरंगाने कर्णधार एंजेलो मॅथ्यूजच्या साथीत विजयावर शिक्कामोर्तब केले.