विजयाचे श्रेय गोलंदाजांनाच - कोहली

सुनंदन लेले 
मंगळवार, 13 जून 2017

चॅम्पियन्स करंडक आगामी लढती
बुधवार, १४ जून - इंग्लंड वि. पाकिस्तान (कार्डिफ)
गुरुवार, १५ जून  - भारत वि. बांगलादेश (बर्मिंगहॅम)
रविवार, १८ जून - अंतिम लढत (लंडन)
सर्व लढती दुपारी ३ पासून

लंडन - चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील अस्तित्वाच्या लढाईत भारताने दक्षिण आफ्रिकेला सहज हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. गोलंदाजांच्या अचूकतेला क्षेत्ररक्षकांकडून मिळालेल्या तेवढ्याच मोलाच्या साथीमुळे हा विजय साकार झाला. कर्णधार विराट कोहलीनेही हे मान्य केले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने विजयाचे श्रेय गोलंदाजांनाच द्यायला हवे, असे स्पष्टपणे सांगितले.

नाणेफेक जिंकण्यापासून ते सांघिक कामगिरीपर्यंत सगळेच भारतीय कर्णधाराच्या मनासारखे घडले. याबाबत तो म्हणाला, ‘‘नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे ठरले. सामना सुरू होण्यापूर्वी प्रत्येक खेळाडूला मी प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असल्याचे बजावले होते. त्याला खेळाडूंनी न्याय दिला. गोलंदाजांनी अचूक मारा करून आपले काम चोख बजावले. त्यांना चपळ क्षेत्ररक्षणाची साथही लाभली. त्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही आणि तेथेच त्यांच्यावरील दडपण वाढत गेले.’’

कोहलीने सहकाऱ्यांचे भरभरुन कौतुक केले. तो म्हणाला, देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इराद्याने खेळाडू प्रेरित होते. ते व्हायलाच हवे होते. तसे झाले नसते, तरच नवल म्हणावे लागेल. तो म्हणाला, ‘‘देशासाठी खेळण्यासाठी योग्यता असते, म्हणूनच तुमची संघात निवड होते. देशाची प्रतिष्ठा पणाला असताना सगळेच खेळाडू प्रेरित झाले. प्रत्येकाने आपले योगदान दिले. अशा महत्त्वाच्या सामन्यात आधी झालेल्या त्याच चुका करून चालत नाही. हेच खेळाडूंना बजावले. त्याला प्रत्येकाने न्याय दिला. हा खऱ्या अर्थाने सांघिक विजय होता, असेही कोहली म्हणाला.

भारतीय खेळाडू चमकले
दक्षिण आफ्रिका पुन्हा आयसीसी स्पर्धेत अपयशी ठरला. कर्णधार डिव्हिलर्स म्हणाला, ‘‘खेळपट्टीचा स्वभाव लक्षात घेऊन भारतीय गोलंदाजांनी उजव्या यष्टीवर मारा केला. त्यांच्या क्षेत्ररक्षणात चमक होती. त्यामुळे आमच्या एकेरी, दुहेरी धावांना लगाम लागला. त्यामुळेच आमच्यावरील दडपण वाढले. तीन फलंदाज धावचीत होणे हे चांगले लक्षण नाही. भारतीयांचे नियोजन परिपूर्ण होते. त्याचवेळी चोख तयारी असूनही मोक्‍याच्या क्षणी आम्ही कमी पडलो.’’

आयसीसी स्पर्धेतील आफ्रिकेच्या अपयशाबाबत डिव्हिलर्स म्हणाला, ‘‘आयसीसी स्पर्धातील आमच्या खराब कामगिरीचे कारण आम्हाला सापडत नाहीये. माझ्या कर्णधारपदाविषयी शंका उपस्थित होत आहेत. माझ्या नेतृत्वगुणांवर मला विश्‍वास आहे. संघात दम आहे. क्षमता आहे. २०१९च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत हाच संघ माझ्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम कामगिरी करेल, असा मला विश्‍वास वाटतो.’’