चाहत्यांना भारत-इंग्लंड फायनल हवी - विराट

पीटीआय
बुधवार, 14 जून 2017

‘कोहली’ कराचीत पिझ्झा विकतो
‘कोहली’ पाकिस्तानात पिझ्झा विकतो, हे वाचून आश्‍चर्य वाटले असेल, तर जस्ट पाकिस्तान थिंग्ज या फेसबुकवरील व्हिडिओ बघायला हवा. कराचीच्या शाहिद ए मिलात येथे ‘कोहली’ पिझ्झा विकत असल्याचा व्हिडिओ अपलोड झाला आहे. कराचीचा हा अर्शद खान हा कोहलीसारखाच दिसतो. तो इस्लामाबादच्या संडे बाझारमध्ये चहा विकत असल्याचा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी लोकप्रिय झाला होता. आता हा नवा व्हिडिओही लोकप्रिय होत आहे. पाकिस्तानातील कोणताही फलंदाज कोहलीइतका यशस्वी नाही, त्यामुळे त्याचे येथे चाहते खूप असल्याचे सांगितले जात आहे.

लंडन - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य तसेच अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी कोण आहेत, हे महत्त्वाचे नाही, असे सांगतानाच विराट कोहलीने चाहत्यांना भारत-इंग्लंड यांच्यात अंतिम लढत हवी असल्याचे सांगितले.

चॅंपियन्स स्पर्धेत भारताची उपांत्य लढत बांगलादेशविरुद्ध गुरवारी आहे. त्यापूर्वी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात उद्या (ता. १४) उपांत्य लढत होत आहे. यंदाचे वर्ष ब्रिटन-भारत संस्कृती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्ताने लॉर्डस क्रिकेट मैदानावर खास मेजवानी आयोजित केली होती. त्यास कोहलीसह माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, मार्गदर्शक अनिल कुंबळे उपस्थित होते. 

उपांत्य लढत कोणाविरुद्ध होत आहे, हे महत्त्वाचे नाही. गटसाखळीचा खडतर टप्पा संपला आहे. आता एक लढत जिंकून अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. प्रत्येकास भारत-इंग्लंड फायनल हवी आहे. दोन्ही संघ चांगले खेळले, तर चाहत्यांची अपेक्षा पूर्ण होईल, असे कोहलीने सांगितले.

अंतिम फेरीत कोणता प्रतिस्पर्धी आवडेल, हा प्रश्‍न कोहलीने खुबीने टाळला. कोणीही अंतिम फेरीत प्रवेश केल्याचा आनंद असेल. आम्ही कुठेही खेळत असलो, तरी चाहते मोठ्या प्रमाणावर असतात, हेच आनंददायक आहे, असेही त्याने सांगितले. स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, तर इंग्लंडमध्ये खेळण्याइतका आनंद नसतो. येथे पांढरा चेंडू जास्त स्विंग होत नाही. ढगाळ वातावरण असेल तर परिस्थिती आव्हानात्मक असते. भिन्न वातावरणात खेळणे हीच येथील खासियत आहे. फलंदाजासमोर ते एक आव्हान असते, असेही कोहली म्हणाला.