महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे खडतर आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

ऑस्ट्रेलिया नक्कीच चांगला संघ आहे. त्यांना हरवणे कठीण असले, तरी अशक्‍य नक्कीच नाही. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी खोलवर आहे. त्यामुळे उद्या सामन्यातील परिस्थितीनुसार भारतीय खेळाडू आपला खेळ कसा करतात याला महत्त्व असेल. न्यूझीलंडविरुद्ध जी जिद्द दाखवली, ती उद्या दाखवल्यास आम्हाला विजयाची चांगली संधी असेल.
- मिताली राज, भारताची कर्णधार

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीची आज लढत

डर्बी - डर्बीचा किल्ला अभेद्य राखत ऑस्ट्रेलियास पराजित करण्याची आशा भारतीय महिला क्रिकेट संघ बाळगून आहे, पण सर्वोत्तम खेळास काहीच रोखू शकत नाही, असे सांगत ऑस्ट्रेलियाने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढतीसाठी आपण सज्ज असल्याचा इशाराच दिला आहे.

मिथाली राजने डर्बीतील काऊंटी ग्राऊंडवर या स्पर्धेतील चारही लढती जिंकल्या आहेत. त्यात यजमान इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या विजयाचाही समावेश आहे, तसेच याच मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाचे शेजारी न्यूझीलंडलाही हरवले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाने गटसाखळीत भारतास आपली ताकद दाखवली आहे. या स्पर्धेत ५६.१६ च्या सरासरीने धावा केलेल्या निकोल बोल्टन हिने ऑस्ट्रेलिया संघ वातावरणाशी पटकन जुळवून घेतो आणि डर्बीही यास अपवाद नसेल असेच सांगितले. 

आमच्या योजनांबाबत आम्हाला कोणतीही शंका नाही. सामना कुठे आहे हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे नसते. आम्ही सर्वोत्तम खेळ केला, तर जिंकणारच याची खात्री आहे. डर्बीत खेळण्याचा अनुभव भारतासाठी मोलाचाच असेल, असे बोल्टनने  सांगितले. सामन्यावरील पकड कधीही निसटून चालणार नाही, हे आम्ही पुरेपूर जाणतो. एखाद दिवशी सूर हरपला तर अन्य संघ तुम्हाला सहज मागे टाकतात, हे या स्पर्धेत दिसले आहे. त्यामुळे आम्ही लय मिळाली की ती सोडणार नाही, असेही तिने स्पष्ट केले.

भारताची कर्णधार मिताली राज बहरात आहे. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या याच स्पर्धेतील सामन्यांत अर्धशतक केले होते; पण तो आता इतिहास झाला आहे असेच ती सांगते. सामन्यातील परिस्थितीस संघ कसा सामोरा जातो ते महत्त्वाचे असते. डर्बी हे आमचे जणू होम ग्राऊंड झाले आहे, पण जिंकण्यासाठी चांगला खेळही आवश्‍यक असतो. येथील वातावरण आम्ही पुरेपूर जाणतो. त्याचा फायदाच होईल, असे मितालीने सांगितले.

दृष्टिक्षेपात आव्हान
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या गेल्या आठपैकी सात लढती जिंकल्या आहेत
भारताने यापूर्वी केवळ एकदा विश्‍वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे
ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा सहा वेळा जिंकली आहे
या स्पर्धेतील गेल्या आठपैकी सात लढतींत ऑस्ट्रेलियाची सरशी
भारताचा गेल्या २५ पैकी २२ एकदिवसीय लढतीत विजय
ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग हीची भारताविरुद्धच्या आठ सामन्यांनंतरची सरासरी ५९.१