मालिका विजयाच्या सप्तपदीसाठी भारत सज्ज

पीटीआय
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

कानपूर - मुंबईत मिळालेला धडा आणि पुण्यात केलेली भरपाई यामुळे पुन्हा गाडी रुळावर आलेला भारतीय संघ उद्याचा न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा एकदिवसीय सामना जिंकून सलग सातव्या मालिकेत यश मिळवण्यास सज्ज झाला आहे.

कानपूर - मुंबईत मिळालेला धडा आणि पुण्यात केलेली भरपाई यामुळे पुन्हा गाडी रुळावर आलेला भारतीय संघ उद्याचा न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा एकदिवसीय सामना जिंकून सलग सातव्या मालिकेत यश मिळवण्यास सज्ज झाला आहे.

सलग सहा मालिका जिंकून विजयी अश्‍वावर स्वार झालेल्या विराट सेनेला मुंबईत धक्का बसला होता; परंतु असे एकामागोमाग विजय मिळवत असताना एखाद्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागतो. यात डगमगून जाण्याचे कारण नाही; मात्र पुढच्या सामन्यात जो संघ पुन्हा विजय मिळवतो तो चॅम्पियन संघ असल्याचे समजले जाते. भारतीय संघाने पुण्यात अशीच दिमाखदार कामगिरी करून दाखवली. आता मालिका जिंकण्यासाठी त्यांना उंचावलेल्या कामगिरीत सातत्य ठेवावे लागणार आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर प्रकाशझोतात पहिला एकदिवसीय सामना होत आहे. भुवनेश्‍वर कुमार आणि कुलदीप यादव यांचे हे घरचे मैदान आहे. त्यामुळे आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर सर्वोत्तम कामगिरी करण्यास ते उत्सुक असतील. भुवनेश्‍वरने पुण्यातील सामन्यात आपला दरारा पुन्हा दाखवून दिला; मात्र त्या सामन्यात चायमन कुलदीप यादवला वगळण्यात आले आहे. उद्याच्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्‍यता कमी आहे.

मुंबईतील पराभवानंतर प्रतिहल्ला करण्याबाबत आम्ही बोललो आणि पुण्यात तसे करून दाखवले. कानपूरमध्येही असाच खेळ करू, असे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. पुण्याहून दोन्ही संघ गुरुवारीच येथे आले आहे. उत्तर भारतात आता पहाटे आणि सकाळी थंडीची चाहूल लागली आहे. या वातावरणाशी दोन्ही संघांनी जुळवून घेतले आहे. असे वातावरण वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असते; परंतु सामना दुपारी १.३० वाजता सुरू होणार असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना सावध राहावे लागेल.

चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न सुटला 
भारताची फलंदाजी भक्कम असली, तरी चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न भेडसावत होता. हार्दिक पंड्या, केदार जाधव त्याअगोदर मनीष पांडे असे प्रयोग झाले; परंतु भरवसा ठेवला जाईल अशा धावा या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांकडून होत नव्हत्या. अखेर दिनेश कार्तिकने पुण्यातील सामन्यात नाबाद ६४ धावांची खेळी करून भरवसा मिळवला आहे. मुंबईतील सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर खेळला होता.