भारताच्या आक्रमणाची धार वाढणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

श्रीलंकेविरुद्ध आज दुसरा एकदिवसीय सामना

पल्लिकल - अपयश आणि निराशेच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंकेविरुद्ध आपल्या आक्रमणाची धार वाढविण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. दोन्ही संघांदरम्यानच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना उद्या होत असून, स्वाभाविकच भारताचे पारडे जड राहणार यात शंका नाही. 

श्रीलंकेविरुद्ध आज दुसरा एकदिवसीय सामना

पल्लिकल - अपयश आणि निराशेच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंकेविरुद्ध आपल्या आक्रमणाची धार वाढविण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. दोन्ही संघांदरम्यानच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना उद्या होत असून, स्वाभाविकच भारताचे पारडे जड राहणार यात शंका नाही. 

कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्यावर श्रीलंका संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यातही सहज पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे नाराज चाहत्यांनी त्यांची बस रोखून धरली होती. मैदानावरील अपयशाचे परिणाम मैदानाबाहेरदेखील दिसू लागल्याने आता श्रीलंका संघ पुरता दडपणाखाली सापडला आहे. याचा फायदा घेऊन फॉर्मात असलेला भारतीय संघ त्यांना साफ निष्प्रभ करण्यासाठीच उद्या मैदानात उतरेल. 

शिखर धवन, विराट कोहली, हार्दिक पंड्या, मनीष पांडे, अजिंक्‍य राहणे यांच्यासारखाच भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू फॉर्मात आहे. अश्‍विन, जडेजा ही फिरकीची जोडी नसली, तरी युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल ही नवी जोडीदेखील श्रीलंका फलंदाजांना समजलेली नाही. भारतीय संघाला प्रयोगाची संधी असली, तरी त्यांच्याकडून असे काही केले जातील असे वाटत नाही. त्यामुळे रहाणे, पांडे, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव यांना बाहेरच बसावे लागेल. 

दुसरीकडे श्रीलंका संघाला नव्याने सुरवात करावी लागणार आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळवायचा असेल, तर त्यांना किमान दोन सामने जिंकायचे आहे. मात्र, त्यांच्या संघातील खेळाडूंची देहबोली बघितल्यास त्यांच्यासमोरील आव्हान कठिण असल्याचेच जाणवते. कसोटी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज दिनेश चंडिमल याला संघात परत बोलावण्याचा निर्णय झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. चंडिमलला वगळल्यामुळे त्यांच्या फलंदाजीचा क्रमही बदलावा लागला आहे. एरवी सलामीला खेळणाऱ्या उपूल थरंगाला सहाव्या क्रमांकावर खेळावे लागत आहे. एकूणच भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजीचा सामना करायचा असेल, तर श्रीलंकेला संयम राखून आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.